मुंबई । भारतीय संघाच्या खेळाडूंना प्रशिक्षण आणि सराव करण्यासाठी देशातील अनेक स्टेडियम खुले करण्यात आले आहेत. परंतु दुसरीकडे भारतीय संघाचे फलंदाज रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्यासाठी वाईट बातमी आहे.
रोहित (Rohit Sharma) आणि रहाणेला (Ajinkya Rahane) प्रशिक्षण आणि सराव करता येणार नाही. कारण असे की, ते दोघेही कोविड- १९ (Covid-19) च्या ‘रेड झोन’मध्ये राहतात. जिथे सध्या खेळाचे मैदान खुले करण्याची परवानगी नाही.
महाराष्ट्र शासनाने ‘ग्रीन आणि ऑरेंज झोन’मध्ये वैयक्तिक प्रशिक्षण घेण्यासाठी प्रेक्षकांविना स्टेडियम खुले करण्याची परवानगी दिली आहे. गृह मंत्रालयाने ३१ मे पर्यंत चालणाऱ्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या नियमांमध्ये सूट दिली होती. त्यानंतर राज्य शासनाने हा निर्णय घेण्यात आला होता.
मुंबईव्यतिरिक्त ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई- विरार, कल्याण आणि डोंबिवलीसारख्या भागाजवळील सर्व परिसरांमध्ये ‘रेड झोन’ घोषित करण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने बुधवारी (२० मे) पीटीआयशी बोलताना सांगितले की, “आम्ही स्टेडियम आणि खेळाचे परिसर खुले करण्यासंबंधीत राज्य शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणार आहोत.”
एमसीएकडे वानखेडे, बांद्रा- कुर्ला परिसर आणि सचिन तेंडुलकर जिमखाना अशा ३ सुविधा आहेत. परंतु शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे सर्व बंद राहणार आहेत.
मरीन ड्राईव्ह येथील परिसरात असणारे ब्रेबॉर्न स्टेडियममध्येही क्रिकेट सराव सुरु करण्यात येऊ शकत नाही. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “खेळाशी निगडीत गोष्टी सुरु करण्यासाठी ते शासनाच्या आदेशाची वाट पाहत आहेत. तोपर्यंत कोणतेच कार्यक्रम सुरु होणार नाहीत.”
क्रीडा मंत्रालयाने यापूर्वीच सर्व खेळाडूंना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत प्रशिक्षण घेण्याची परवानगी दिली आहे. इतकेच नव्हे तर, किरण रिजिजू यांनी मंगळवारी म्हटले होते की, “क्रीडा संघटना स्टेडियममध्ये त्यांचे कार्यक्रम आयोजित करू शकतात. परंतु प्रेक्षकांना यामध्ये परवानगी दिली जाणार नाही. प्रत्येक क्रीडा संघटना आणि खेळाडूंनी मार्गदर्शकतत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. खेळाडूंना थुंकणे, मिठी मारणे आणि हात मिळवण्यावर कडक बंदी आहे.”
मुंबईचा कोविड-१९ ची सर्वाधिक प्रकरणे असणाऱ्या शहरांमध्ये समावेश आहे. मुंबईत या व्हायरसची एकूण २४, ११८ प्रकरणे समोर आली आहेत. त्यातील ४,७०२ रुग्ण बरे झाले आहेत. तर या व्हायरसमुळे आतापर्यंत ८४१ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेटच्या इतिहासातील ‘हे’ ५ प्रसंग, जिथे खेळाडूंना नडलाय त्यांचा अतिआत्मविश्वास
-आयपीएलमध्ये हॅट्रिक विकेट घेणारे ७ वेगवान गोलंदाज
-मॅच पहायला आलेल्या मुलीवरच झालं पाॅंटिंगला प्रेम, पुढे अशी घडली खास लव्हस्टोरी