मुंबई | भारतीय क्रिकेट संघातील सलामीवीर रोहित शर्मा आणि कसोटी उपकर्णधार अजिंक्य राहणे यांना क्रिकेटचा सराव करण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट बघावी लागणार आहे. रोहित आणि अजिंक्य हे दोन्ही खेळाडू मुंबईच्या रणजी संघाकडून खेळतात. हे दोघेही मुंबईमध्ये असून येथे कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे मुंबईला रेड झोन घोषित केले आहे.
मुंबई रेड झोनमध्ये असल्या कारणाने येथे कोणतीही क्रिकेट अकादमी सुरू नाही. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र शासनाने क्रीडा मैदाने आणि स्टेडियम सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने ग्रीन आणि ऑरेंज झोनमधलेच स्टेडियम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मुंबई रेड झोनमध्ये येत असल्याने येथील स्टेडियम हे खुले राहणार नाही. त्याचमुळे रोहित आणि अजिंक्य सराव करू शकणार नाहीत.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की स्टेडियम आणि क्रीडा सुविधा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचे तंतोतत पालन करण्यात येणार असल्याचे सांगितले. एमसीएस जवळ तीन पर्याय उपलब्ध आहेत. वानखेडे स्टेडियम, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आणि कांदिवलीमध्ये सचिन तेंडुलकर जिमखाना. पण लॉकडाऊनमुळे हे सारे बंदच राहतील.