भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी२० सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्वतः रोहितने शानदार अर्धशतकी खेळी करत भारताला मोठी धावसंख्या रचून दिली. याबरोबरच त्याने ईडन गार्डन्स मैदानासोबतचे आपले खास नाते आणखीनच वृद्धिंगत केले.
रोहितची आणखी एक लाजवाब खेळी
रांची येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात रोहितने अर्धशतकी खेळी केली होती. त्याने तोच फॉर्म कायम ठेवत या सामन्यातही तुफानी फटकेबाजी करताना टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २६ वे अर्धशतक झळकावले. त्याने सलामीला फलंदाजीला उतरत ३१ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५६ धावा तडकावल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट तब्बल १८० इतका जबरदस्त होता. ईश सोढीच्या एका अफलातून झेलामुळे त्याची खेळी संपुष्टात आली.
रोहित आणि ईडन गार्डन्सचे खास नाते
हा सामना ज्या मैदानावर खेळला गेला त्या ईडन गार्डन्स मैदानाशी रोहित शर्मा याचे खास नाते आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या रोहितने आयपीएलमध्ये नेतृत्वाची सुरुवात २०१३ साली याच मैदानावरून केली होती. तसेच त्याने जिंकलेल्या २०१३ व २०१५ आयपीएल स्पर्धांचे अंतिम सामने देखील याच मैदानावर खेळले गेले होते. २०१२ मध्ये केकेआर विरुद्ध त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील एकमेव शतकी खेळी याच मैदानावर साकारली आहे. २०१३ मध्ये त्याने याच मैदानावर कसोटी पदार्पण करत शतक झळकावले होते. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी २६४ धावांची खेळी त्याने याच मैदानावर केली होती. आज त्याने पुन्हा एकदा एक अप्रतिम कामगिरी करत ईडन गार्डन्स मैदानावरील आपला स्वप्नवत खेळ कायम ठेवला.