इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जाणाऱ्या मुंबई इंडियन्सची गाडी यंदा रुळावरुन घसरताना दिसत होती. युएईत सुरू असलेल्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात त्यांना सलग ३ पराभवांना सामोरे जावे लागले होते. परंतु अखेर मंगळवार रोजी (२८ सप्टेंबर) अबु धाबी येथे पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी ६ विकेट्सने बाजी मारत विजयाचे खाते उघडले आहे.
मात्र या विजयात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा विशेष हातभार लावू शकला नाही. त्याने या सामन्यात एकेरी धावा करत आपल्या नावे एक लाजिरवाणा विक्रम जोडला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १३५ धावा फलकावर लावल्या होत्या. प्रत्युत्तरात नेहमीप्रमाणे क्विंटन डी कॉक आणि कर्णधार रोहित शर्मा मुंबईकडून सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. परंतु त्यांना संघाला भक्कम सुरुवात करुन देण्यास यश आले नाही. रोहित १० चेंडूंचा सामना करताना फक्त ८ धावांवर युवा रवि बिश्नोईच्या गोलंदाजीवर मनदिप सिंगच्या हाती झेल देत बाद झाला.
यासह आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा एकेरी धावसंख्येवर बाद होण्याचा लाजिरवाणा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. याबाबतीत त्याने अव्वलस्थानी उडी घेतली आहे. रोहित त्याच्या आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत तब्बल ५९ वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे.
या नकोशा विक्रमात रोहितनंतर कोलकाता नाईट रायडर्सचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याचा नंबर लागतो. तो ५८ वेळा एकेरी धावसंख्येवर बाद होत दुसऱ्या स्थानावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्जचा रॉबिन उथप्पा (५१ वेळा) आणि सुरेश रैना (५१ वेळा) संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांच्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन हादेखील ४७ वेळा एकेरी धावसंख्येवर बाद होत या यादीत चौथ्या स्थानावर आहे.
असे असले तरीही, रोहित यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंतच्या १० सामन्यांमध्ये एका अर्धशतकाच्या मदतीने ३३४ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
लाईव्ह सामन्यातील ‘त्या’ विवादावरुन कार्तिकने उठवला पडदा, सांगितले का अश्विनवर भडकला मॉर्गन?
पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी संजनाने केली होती भविष्यवाणी, बुमराह घेईल ‘इतक्या’ विकेट्स अन्…
केएल राहुलला बाद करताच पोलार्डकडून ३०० व्या टी२० विकेट्सचे भन्नाट सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ