धरमशाला। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात सध्या तीन सामन्यांची टी२० मालिका (T20 Series) सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना (2nd T20I) हिमाचल प्रदेश क्रिकेट असोशिएशन स्टेडियम, धरमशाला येथे शनिवारी (२६ फेब्रुवारी) होणार आहे. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला दोन मोठे विक्रम करण्याची संधी असणार आहे. हा सामना शनिवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सरू होईल.
रोहित टाकू शकतो विराटला मागे
शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यात रोहितने ७ किंवा त्यापेक्षा अधिक चौकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटला मागे टाकून दुसरा क्रमांक मिळवू शकतो. तसेच त्याने ८ चौकार मारले, तर तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ३०० चौकारांचा टप्पा पार करू शकतो. असा पराक्रम करणारा तो पॉल स्टर्लिंगनंतरचा जगातील दुसरा क्रिकेटपटू ठरू शकतो.
आत्तापर्यंत केवळ आयर्लंडचा क्रिकेटपटू पॉल स्टर्लिंग यालाच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ३०० पेक्षा अधिक चौकार मारता आले आहेत. त्याने ३१९ चौकार मारले आहेत. तसेच तोच सध्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० चौकार मारणाराही खेळाडू आहे. सध्या त्याच्या पाठोपाठ सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० चौकार मारण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर २९८ चौकारांसह भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर २९२ चौकारांसह रोहित शर्मा आहे (Most Fours inT20I).
कर्णधार म्हणून रोहित करू शकतो विश्वविक्रम
कर्णधार म्हणून देखील रोहितला विश्वविक्रम करण्याची संधी असणार आहे. भारतीय संघाने मायदेशात आत्तापर्यंत रोहितच्या नेतृत्त्वाखाली १५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकले आहेत. त्यामुळे जर रोहितच्या नेतृत्त्वात भारताने श्रीलंकेविरुद्धचा दुसरा टी२० सामना जिंकला, तर मायदेशात १६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकणारा रोहित पहिला कर्णधार ठरेल (most wins at home as captain).
सध्या मायदेशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत रोहित केन विलियम्सन आणि ओएन मॉर्गन यांच्यासह संयुक्तरित्या अव्वलस्थानी आहे. न्यूझीलंडचा कर्णधार विलियम्सन आणि इंग्लंडचा कर्णधार मॉर्गन यांनी आपापल्या संघांच्या मायदेशात कर्णधार म्हणून प्रत्येकी १५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकेल आहेत. त्यामुळे आता या दोघांनाही मागे टाकण्याची संधी रोहितकडे असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
नवजात मुलीचा मृत्यू विसरून ‘या’ क्रिकेटरने लगावले शतक, चाहत्यांसोबतच खेळाडूंनीही ठोकला सलाम
भारत-श्रीलंका दुसऱ्या टी२० सामन्यात पाऊस बनणार खलनायक? पाहा काय आहे हवामानाचा अंदाज