भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान अनेक खेळाडू विश्रांतीच्या मिळालेल्या वेळात एकत्र वेळ घालवताना दिसत आहे. यादरम्यान, ते एकमेकांची खिल्ली उडवण्याचीही संधी सोडताना दिसत नाही. नुकताच भारताचा सलामीवीर रोहित शर्माने रिषभ पंतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भारताची इंग्लंड विरुद्ध ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेपूर्वी रोहित शर्माने युवा यष्टीरक्षक पंतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि त्याची तुलना रॅपर बादशहा सोबत केली आहे. रोहितने या फोटो सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘आमच्याकडे आमचा हा बादशहा आहे’. या फोटोमध्ये दिसते की रिषभने रॅपर बादशहा घालतो, अगदी तशाच प्रकारचे गॉगल घातले आहेत.
https://www.instagram.com/p/CR9L4kHjLnJ/
भारतीय फलंदाज केदार जाधवने या पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे की ‘आपले स्वतःचे चाचा नेहरू’, ही प्रतिक्रिया देताना केदारचा इशारा पंतच्या टी-शर्टवरील गुलाबाच्या चित्राकडे होता. तसेच स्वत: रिषभने देखील या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले ‘हाहाहा, काय यार, भैय्या.’
भारतीय संघाचा इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी डरहॅममध्ये कॅम्प लागलेला होता. येथे काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध एक सराव सामना भारतीय संघाने खेळला आहे. या सामन्यात रिषभ पंत सहभागी होऊ शकला नव्हता. कारण त्यापूर्वी तो कोरोना संक्रमित अढळला असल्यामुळे क्वारंटाईन होता. तो कोरोनामधून आता पूर्णपणे बरा झाला असून काहीदिवसांपूर्वीच भारतीय संघात देखील सामील झाला आहे आणि सरावालाही त्याने सुरुवात केली आहे.
पंत गेल्या अनेक महिन्यांपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने ऑस्ट्रेलिया दौरा २०२०-२१ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत, तसेच यावर्षाच्या सुरुवातीला मायदेशात इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत उत्तम प्रदर्शन केले होते. त्यामुळे आगामी इंग्लंड दौऱ्यातील यजमान इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जागतिक अव्वल क्रमांकाच्या बॉक्सरकडून पूजा राणीचा एकतर्फी पराभव; ऑलिंपिक्स २०२०मधून पडली बाहेर
‘तर भारतात एन्ट्री देणार नाही, बीसीसीयकडून मिळाली धमकी’, हर्षल गिब्सचा गंभीर आरोप
संजूच्या खराब प्रदर्शनावर प्रशिक्षक द्रविडही आहेत निराश; म्हणाले, ‘तो मागे वळून पाहिल तेव्हा…’