इंडियन प्रीमियर लीग २०२१ मधील सतरावा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यादरम्यान खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने फलंदाजीत एकाकी झुंज दिली. रोहितने अर्धशतकी खेळी केली. या अर्धशतकासह रोहित एका खास यादीत चौथ्या स्थानी दाखल झाला.
रोहितचे झुंजार अर्धशतक
मुंबई इंडियन्ससाठी या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने सलामीवीराची भूमिका निभावली. दुसऱ्या बाजूने इतर फलंदाज बाद होत असताना रोहितने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने अठराव्या षटकापर्यंत किल्ला लढवत फलंदाजीसाठी अवघड असलेल्या खेळपट्टीवर ५२ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ६३ धावांची झुंजार खेळी केली. त्याच्या या योगदानामुळे मुंबईने निर्धारित २० षटकात ६ बाद १३१ धावा काढल्या.
रोहितचे विक्रमी अर्धशतक
रोहितने या सामन्यात अर्धशतक ठोकताच आयपीएल कारकिर्दीतील आपले ४० वे अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीची बरोबरी केली. विराटनेही आयपीएलमध्ये ४० अर्धशतके झळकावली आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याचा मान सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरकडे जातो. वॉर्नरने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ४९ अर्धशतक पूर्ण केली आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन असून त्याने ४३ वेळा अर्धशतके ठोकली आहेत.
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ४० किंवा त्यापेक्षा अधिक अर्धशतके या चार फलंदाजांनाच आत्तापर्यंत झळकावता आली आहेत.
रोहितची दैदिप्यमान आयपीएल कारकीर्द
रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. यासह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याने आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला पाच आयपीएल विजेतेपदे मिळवून दिली आहेत. फलंदाज या नात्याने रोहित आयपीएलमध्ये २०५ सामन्यात ५४३१ धावा काढण्यात यशस्वी ठरला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही तो तिसऱ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हिटमॅनने टाकले धोनीला मागे, आता ‘या’ विक्रमात फक्त विराट, गंभीर आणि वॉर्नर रोहितच्या पुढे
Video: निकोलस पूरनने घेतला डोळ्यांचे पारणे फेडणारा कृणाल पंड्याचा अप्रतिम झेल, एकदा पाहाच