काल मोहालीत भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने द्विशतक झळकावले. हे द्विशतक त्याने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी केले असल्याने ते त्याने त्याची पत्नी रितिकाला समर्पित केले.
काल रोहितची पत्नी स्टेडियममध्ये उपस्थितीत होती. जेव्हा रोहितने शतक पूर्ण केले होते तेव्हा ते रितिकासाठी असल्याचा इशारा त्याने केला होता. त्यानंतर जेव्हा रोहितचे द्विशतक पूर्ण झाले तेव्हा रितिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. रोहितचा काल लग्नाचा दुसरा वाढदिवस होता.
सामना संपल्यानंतर रोहितला जेव्हा या खास दिवशी केलेल्या द्विशतकाविषयी प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला, ” माझी पत्नी माझ्याबरोबर या दिवशी उपस्थितीत आहे याचा मला आनंद आहे. मला माहित आहे तिला मी दिलेली ही द्विशतकाची भेट आवडेल. ती माझी शक्ती आहे. ती नेहमीच माझ्याबरोबर उभी असते. तुम्हाला या खेळात खूप ताण असतो. त्यावेळी असे कोणीतरी आजूबाजूला असणे नेहेमीच खास असते.”
तो पुढे म्हणाला ” हा आमचा लग्नाचा दुसरा वाढदिवस आहे. पण त्या पेक्षाही आम्ही सामना जिंकलो आहे हे महत्वाचे. आम्ही सामन्यात योग्य गोष्टी करण्याचे प्रयत्न केले. आता आम्ही विशाखापट्टणमला होणाऱ्या सामन्याकडे लक्ष देत आहोत.”
काल झालेला हा सामना भारताने १४१ धावांनी जिंकला. भारताचा पुढील सामना १७ डिसेंबरला विशाखापट्टणमला होणार आहे. हा सामना ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना असणार आहे.