रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक 2022 सुपर-4 फेरीतील श्रीलंकेविरुद्धचा करा अथवा मरा सामना गमावला आहे. यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सुपर-4 सामन्यातही भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सलग 2 पराभवांसह भारताच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने युवा खेळाडूसोबत वाईट वर्तन केल्याचे दिसले. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्याचे झाले असे की, भारताच्या 174 धावांच्या आव्हानाचा बचाव करताना भारताकडून युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) विसावे षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकात भारताला 7 धावांचा बचाव करायचा होता. या षटकादरम्यान अर्शदीप कर्णधार रोहितला (Captain Rohit Sharma) काहीतरी सांगण्यासाठी गेला होता. त्याच्या हातवाऱ्यांवरून असे दिसते की, तो रोहितला क्षेत्ररक्षण सजवण्यासंबंधी काहीतरी सांगण्यासाठी गेला होता.
परंतु रोहितने त्याचे म्हणणेसुद्धा ऐकले नाही. जसा अर्शदीप त्याच्याजवळ आला, तसे रोहित त्याच्यापासून दूर निघून गेला. रोहितने युवा खेळाडूला दिलेली ही वागणूक क्रिकेटप्रेमींना अजिबात आवडलेली नाही. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून बहुतांश चाहते रोहितवर टिका करत आहेत.
एका चाहत्याने लिहिले की, तुम्ही युवा खेळाडूंचे म्हणणे जर मैदानावर ऐकतच नसाल, तर ड्रेसिंग रूममध्ये जाऊन त्याला सांत्वना देण्याचा काही फायदा नाही. तर एका चाहत्याने रोहितला थेट गर्विष्ठ कर्णधार म्हटले आहे.
This is really bad, seriously. No point going to the dressing room & hugging them if you are doing these on field to youngsters. https://t.co/QvYfuRFd6P
— arfan (@Im__Arfan) September 6, 2022
https://twitter.com/crickvikram/status/1567218900672315392?s=20&t=Eub03Rwt1l32YHOCw9BXVw
दरम्यान अर्शदीपने विसाव्या षटकात किफायतशीर गोलंदाजी केली. 6 चेंडूत 7 धावांची आवश्यकता असताना त्याने पहिल्या 4 चेंडूत 5 धावा दिल्या. पाचव्या चेंडूवर मात्र श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाकाने 2 धावा काढत संघाला सामना जिंकून दिला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 173 धावा फलकावर लावल्या. भारताकडून कर्णधार रोहितने एकाकी झुंज दिली. 41 चेंडू खेळताना त्याने 72 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 षटकार आणि 5 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव 34 धावा करू शकला. प्रत्युत्तरात सलामीवीर पथुम निसांका (52 धावा) आणि कुसल मेंडिस (57 धावा) यांच्या खेळींच्या जोरावर श्रीलंकेने 1 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. या विजयासह श्रीलंकेने अंतिम सामन्यातील त्यांची जागा निश्चित केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पराभवाने संतापले चाहते! थेट टीम इंडियाला बॉयकॉट करण्याची केली मागणी
टीम इंडियाचे गर्वहरण! श्रीलंकेने केला पराभव; अंतिम फेरीच्या आशा अंधूक
कार्तिकाला संघातून वगळलेच कशामुळे? पाकिस्तानी दिग्गजालाही वाटत आहे आश्चर्य






