भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व सांभाळणार्या रोहित शर्माची बॅट सध्या धमाल करत आहे. टी२० विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध लाजिरवाण्या कामगिरीनंतर, रोहितने गेल्या पाच टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तीन अर्धशतके ठोकून शानदार पुनरागमन केले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या चालू मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहितने ४८ आणि ५५ धावांची शानदार खेळ्या केल्या. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारतीय संघ सलग दोन सामने जिंकून मालिका जिंकू शकला आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर रोहितच्या बॅटमधून मोठ्या खेळीचीही चाहते वाट पाहत आहेत. जेणेकरून त्याला पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिली मालिका ३-० अशा फरकाने जिंकता येईल.
कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदान रोहितसाठी भाग्यवान ठरले आहे. अशा स्थितीत त्या भाग्यवान मैदानावर दोन विक्रम रोहितची आतुरतेने वाट पाहत आहेत. रविवारी त्याची बॅट चालली तर तो हे दोन्ही विक्रम आपल्या नावावर करेल.
गाठू शकतो षटकारांचे दीडशतक
रोहित शर्माने रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात शानदार फलंदाजी करताना ५५ धावा केल्या. यादरम्यान त्याने पाच षटकार मारले आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये आपल्या षटकारांची संख्या १४७ वर नेली. रविवारी त्याच्याकडे टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५० षटकारांचा टप्पा ओलांडण्याची मोठी संधी आहे. रविवारी तीन षटकार मारण्यात तो यशस्वी ठरला, तर आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये या स्थानावर पोहोचणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरेल. या यादीमध्ये न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल (१६१) पहिल्या क्रमांकावर आहे.
कर्णधार म्हणून करू शकतो ही कामगिरी
रोहित शर्माने आतापर्यंत ६ वेळा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कर्णधारपद भूषवले आहे. यादरम्यान त्याने न्यूझीलंड संघाविरुद्ध २५२ धावा केल्या आहेत. रविवारी रोहितने ३६ धावांचा टप्पा ओलांडला तर तो न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनेल. सध्या हा विक्रम इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनच्या नावावर आहे. मॉर्गनने न्यूझीलंडविरुद्धच्या १० टी२० सामन्यात २८७ धावा केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे, ज्याने भारतीय संघाचे नेतृत्व करताना ८ सामन्यात २१८ धावा केल्या आहेत.