टी20 विश्वचषकापूर्वी शनिवारी (1 जून) भारत आणि बांगलादेश यांच्यात न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर सराव सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान एक चाहता रोहित शर्माला भेटण्यासाठी चक्क मैदानावर धावून आला. या प्रकारामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला होता. यानंतर पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मैदानावर पोहोचून या चाहत्याला पकडलं.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची फॅन फॉलोइंग जगभरात आहे. याचं ताजं उदाहरण भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामन्यात पाहायला मिळालं. सामन्यादरम्यान रोहित शर्माचा एक वेडा चाहता त्याला भेटण्यासाठी मैदानात धावून आला. त्यावेळी बांगलादेशचा संघ फलंदाजी करत होता. या चाहत्यानं सुरक्षा कठडे तोडले आणि रोहितला भेटण्यासाठी मैदानात आला. हे पाहून पोलीस आणि सुरक्षा रक्षक चक्रावले. त्यांनी लगेच मैदानात धाव घेत या चाहत्याला पकडलं. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये हा चाहता रोहितसोबत हस्तांदोलन करताना दिसत आहे.
यावेळी रोहित शर्माची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. रोहित पोलिसांना चाहत्याशी सौम्यपणे वागण्यास सांगत होता. चाहत्याला कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये, असं रोहित सांगत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. युजर्स कमेंट करून रोहितच्या वागणुकीचं कौतुक करत आहेत. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
The fan who breached the field and hugged Rohit Sharma was taken down by the USA police.
– Rohit requested the officers to go easy on them. pic.twitter.com/MWWCNeF3U2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 1, 2024
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतानं बांगलादेशचा 60 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकांत 5 गडी गमावून 182 धावा केल्या होत्या. बांगलादेशसमोर विजयासाठी 183 धावांचं लक्ष्य होतं. मात्र संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 122 धावाच करू शकला.
टी20 विश्वचषक 2024 साठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान
महत्त्वाच्या बातम्या –
सराव सामन्यात बांगलादेशला हाणला! हार्दिक पांड्याचा अष्टपैलू खेळ, रिषभ पंतही चमकला
या नियमामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावा मिळतील मोफत! टी20 विश्वचषकात लागू होण्याची शक्यता
दिनेश कार्तिकची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, इमोशनल पोस्ट करून मानलं चाहत्यांचं आभार