गेल्या काही काळापासून भारतीय कर्णधार रोहित शर्माचा कसोटी फार्म खूपच खराब आहे. एकीकडे त्याच्या नेतृत्वाखाली संघाला सतत पराभवाचा सामना करावा लागतोय, तर दुसरीकडे तो फलंदाजीतही सातत्यानं अपयशी होतोय. भारतानं बांगलादेशविरुद्ध मालिकेनं आपल्या कसोटी हंगामाला सुरुवात केली, मात्र तेव्हापासून रोहित सतत धावांसाठी झगडताना दिसतोय. त्याचा खराब फॉर्म ऑस्ट्रेलियातही जारी राहिला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीच्या अखेरच्या दिवशी रोहितकडून भारतीय चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. रोहितकडे तशी संधी देखील होती. अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी 340 धावांची आवश्यकता आहे. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित सलामीला येऊन महत्त्वाचं योगदान देईल असं चाहत्यांना वाटत होतं. रोहित काही काळ क्रिजवर टीकून राहण्यात यशस्वी देखील ठरला. मात्र अखेर कांगारु कर्णधार पॅट कमिन्सनं त्याची विकेट घेतली. रोहित 40 चेंडूत 9 धावा करून बाद झाला.
रोहित शर्मा मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावातही फ्लॉप झाला होता. त्यानं सलामीला येऊन केवळ 3 धावा केल्या. आतापर्यंत या कसोटी मालिकेच्या 5 डावांमध्ये रोहित शर्मानं केवळ 31 धावा केल्या आहेत. तो सातत्यानं फ्लॉप होत असल्याचं पाहून चाहते देखील त्याच्यावर नाराज आहेत. मेलबर्नं कसोटीच्या दुसऱ्या डावातही अपयशी ठरल्यानंतर सोशल मीडियावर आता चाहत्यांनी त्याच्या निवृत्तीची मागणी सुरू केली.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. अनेकांनी रोहितवर टीका करत त्याला कसोटी क्रिकेट सोडण्याचा सल्ला दिला. रोहितच्या खराब कामगिरीमुळे भारताला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आणि WTC फायनलमधील स्थान गमवावं लागलं असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
हेही वाचा –
चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने डाव का घोषित केला नाही? स्टार खेळाडूने सांगितले कारण
WTCच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?
रोहितच्या नेतृत्वावर माजी दिग्गजाची तिखट प्रतिक्रिया! म्हणाला, “जर मी आता निवडकर्ता असतो, तर…”