भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान संघात रविवारी (२८ ऑगस्ट) दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आशिया चषक २०२२ मधील दुसरा सामना खेळला जाणार आहे. या हाय व्होल्टेज लढतीपूर्वी रोहितने पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान पत्रकाराने रोहितला एक प्रश्न विचारला, ज्यावर त्याने मजेशीर उत्तर देत पत्रकाराचीच फिरकी घेतली.
पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) सामन्याच्या पूर्वसंध्येला रोहितने पत्रकार परिषद (Rohit Sharma Press Conference) घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान रोहितने प्लेइंग इलेव्हनपासून ते संघाच्या पाकिस्तानविरुद्धच्या योजनेबद्दल बरेचसे खुलासे केले. यादरम्यान एका पत्रकाराने त्याला सलामी जोडीदाराबद्दल (Team India’s Opening Pair) प्रश्न विचारला. पाकिस्तानविरुद्ध नवी सलामी जोडी दिसू शकते. विराट कोहलीचे (Virat Kohli) नाव यात आघाडीवर असल्याची चर्चा आहे, हे खरे आहे का?
या प्रश्नावर हजरजबाबी रोहितने भन्नाट उत्तर देत त्या पत्रकाराची बोलती बंद केली. रोहित उत्तर (Rohit Sharma Funny Answer) देताना म्हणाला की, ‘उद्या नाणेफेकीनंतर तुम्हीच पाहून घ्या कोण सलामीला फलंदाजीसाठी येईल. थोडं तरी गुपित राहूदेत यार.’
रोहितचे असे उत्तर ऐकून पत्रकार परिषदेत सर्वत्र हशा पिकला. या प्रसंगाचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/AKASH__47__/status/1563548403187187712?s=20&t=WiG6GsRPayKGLJjoHs9DPw
दरम्यान रोहितने पत्रकार परिषदेत वेगवेगळ्या मुद्यांवर हात घातला. प्लेइंग इलेव्हनबद्दल विचारले असता रोहित म्हणाला की, “आम्ही प्लेइंग इलेव्हनबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्ही आज रात्रीचा (श्रीलंका-अफगाणिस्तान) सामना पाहू आणि त्यानुसार निर्णय घेऊ. कारण सामना त्याच मैदानावर खेळला जाणार आहे.”
गोलंदाजी विभागाबाबत रोहितची प्रतिक्रिया
आशिया चषकासाठी भारतीय संघात अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल यांची कमी आहे. कारण हे दोन्हीही गोलंदाज दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर झाले आहेत. त्यांच्या अनुपस्थित रोहित भारतीय संघातील युवा गोलंदाजांवर विश्वास दाखवणार असल्याचे त्याने स्वत: म्हटले आहे.
“पाकिस्तानविरुद्ध सर्व युवा गोलंदाजांना संधी मिळू शकते. आम्ही त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यासाठी तयार आहोत. बघू यावर त्यांची कशी प्रतिक्रिया येईल. आम्ही सर्वश्रेष्ठ प्लेइंग इलेव्हनसह मैदानावर उतरणार आहोत. गेल्या काही दिवसांत दिनेश कार्तिकनेही चांगले प्रदर्शन केले आहे,” असे रोहितने म्हटले.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रिस्क से ही इश्क है! पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी भारतीय कर्णधाराने बनवलाय भन्नाट प्लॅन
‘हाय व्होल्टेज’ लढतीसाठी भारत-पाकिस्तान सज्ज; लाईव्ह ते संभाव्य प्लेइंग इलेव्हन, वाचा सर्व डिटेल्स
आशिया चषकातील महामुकाबल्यापूर्वी ‘किंग कोहली’ने दिला आठवणींना उजाळा! सांगितले पाकिस्तानविरुद्धचे किस्से