आयपीएल २०२० चा अंतिम सामना गतविजेते मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात जबरदस्त रंगला आहे. दिल्लीने दिलेल्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा व क्विंटन डी कॉक यांनी मुंबईला आश्वासक सुरुवात दिली. डी कॉक परतल्यानंतरही रोहितने एक बाजू लावून धरत सामना मुंबईचा हातून निसटू दिलेला नाही. यादरम्यान, रोहितने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील ३८ वे अर्धशतक पूर्ण करताना एक विशिष्ट विक्रम स्वतःच्या नावे केला.
आपल्या आयपीएल कारकिर्दीतील २०० वा सामना खेळत असलेल्या रोहितने कागिसो रबाडाला चौकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकासोबतच रोहितने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील ५० व्या, १०० व्या, १५० व्या आणि २०० व्या सामन्यात अर्धशतक झळकावण्याची अद्वितीय कामगिरी केली.
आयपीएलमध्ये आतापर्यंत दोनच खेळाडू २०० सामने खेळू शकले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी आयपीएलमध्ये २०० सामने खेळलेला पहिला खेळाडू ठरला होता. धोनीने चालू हंगामातील ३७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना ही कामगिरी केली होती. त्यानंतर, आज रोहितने २०० आयपीएल सामन्यांचा पल्ला गाठला.
रोहित शर्माने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात २००८ मध्ये डेक्कन चार्जर्स संघाकडून केली. त्याने २००८-२०१० अशी तीन वर्षे डेक्कन चार्जर्सचे प्रतिनिधित्व केले. आयपीएल २०११ पासून तो मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य आहे. मुंबईने रोहितच्याच नेतृत्वाखाली सर्वाधिक चार वेळा आयपीएल चे विजेतेपद आपल्या नावे केले आहे.
हेही वाचा-
-IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक दांड्या गुल करणारा संघाचा हुकमी एक्का, घेतले सर्वाधिक बळी
-रोहित…रोहित…मुंबई…मुंबई…फायनलमध्ये रोहितचा मुंबईकडून ‘हिट’ विक्रम
-एकच फाईट वातावरण टाईट! आयपीएल फायनलमध्ये अर्धशतक झळकावणारा अय्यर ‘या’ यादीत थेट दुसऱ्या स्थानी
-आयपीएल फायनलमध्ये १६० धावांपेक्षा कमी धावांचं टारगेट असताना पाहा काय लागलेत निकाल