भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघामध्ये ३ टी२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेपासून रोहितने भारताच्या टी२० संघाची नियमित कर्णधार म्हणून जबाबदारी घेतली आहे. या मालिकेपूर्वी विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी आता रोहित शर्माला देण्यात आली आहे.
तसेच पहिल्याच सामन्यात रोहित शर्मा आणि भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत न्यूझीलंड संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) पार पडणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. तर न्यूझीलंड संघ जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. अशातच भारतीय कर्णधार रोहित शर्माला देखील मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी आहे.
भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा हा सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या नावे अनेक मोठ्या विक्रमांची नोंद आहे. तसेच षटकार मारण्याच्या बाबतीत देखील तो भरपूर पुढे आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण ४४९ षटकार मारले आहेत. या दरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ६३, वनडे क्रिकेटमध्ये २४४ आणि टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४२ षटकार मारले आहेत.
रोहित शर्माने भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यात जर एक षटकार मारला तर त्याच्या नावे ४५० षटकारांची नोंद होणार आहे. असा कारनामा करणारा तो जगातील तिसरा आणि पहिला भारतीय फलंदाज ठरू शकतो.
आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५० षटकारांचा कारनामा केवळ २ फलंदाजांना करता आला आहे. ज्यामध्ये शाहिद आफ्रिदी आणि ख्रिस गेल यांचा समावेश आहे. वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने आतापर्यंत एकूण ५५३ षटकार मारले आहेत. तर शाहिद आफ्रिदीने ४७६ षटकार मारले आहेत.
तसेच रोहित शर्माला आणखी एक मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे. जर त्याच्या बॅटमधून ८ षटकार निघाले तर, तो टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५० षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
“तो ‘हिट ओर मिस’ खेळाडू नाही”, गावसकरांच्या टीकेला ईशान किशनच्या माजी प्रशिक्षकांचे प्रत्युत्तर
रोहित, चहल, गप्टीलसह ‘हे’ खेळाडू भारत-न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यांत करू शकतात खास विक्रम