बर्मिंगहॅम। आज(2 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध बांगलादेश संघात 40 वा सामना एजबस्टर्न स्टेडीयमवर सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाला योग्य ठरवत भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि केएल राहुलने चांगली सुरुवात केली आहे. त्यांनी शतकी सलामी भागीदारी केली आहे. तसेच रोहितने 45 चेंडूत त्याचे वनडेतील 43 वे अर्धशतकही पूर्ण केले आहे. हे अर्धशतक पूर्ण करताना रोहितने 3 षटकार मारले आहेत.
त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 362 षटकार झाले आहेत. हा विक्रम करताना त्याने भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला मागे टाकले आहे. धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 358 षटकार आहेत.
याबरोबरच रोहितने वनडेमध्येही सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत धोनीची बरोबरी केली आहे. या दोघांच्याही नावावर सध्या 228 षटकार आहेत.
तसेच रोहित अजून या सामन्यात नाबाद खेळत आहे. त्यामुळे त्याच्या या षटकारांमध्ये अजून वाढ होऊ शकते.
#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय क्रिकेटपटू –
362 – रोहित शर्मा*
358 – एमएस धोनी
263 – सचिन तेंडुलकर
251 – युवराज सिंग
247 – सौरव गांगुली
#वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय क्रिकेटपटू –
228 षटकार – एमएस धोनी
228 षटकार – रोहित शर्मा*
195 षटकार – सचिन तेंडुलकर
190 षटकार – सौरव गांगुली
155 षटकार – युवराज सिंग
महत्त्वाच्या बातम्या –
–२००७ला विश्वचषकात संधी मिळालेला टीम इंडियाचा शिलेदार खेळतोय १२ वर्षांनी विश्वचषकात
–बांगलादेश विरुद्ध केदार जाधवला वगळले, त्याच्याऐवजी हा खेळाडू करतोय विश्वषकात पदार्पण
–टॉप ५: भारत-बांगलादेश संघात होणाऱ्या सामन्यात हे खास ५ विक्रम करण्याची भारतीय खेळाडूंना संधी






