उद्यापासून(14 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या वनडे मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहे.
मात्र ही मालिका सुरु होण्याआधी भारतीय संघासमोरील चिंता वाढली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पहिल्या वनडे सामन्याआधी सराव करताना भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला चेंडू लागला आहे.
त्यामुळे त्याच्यावर भारतीय संघाचे फिजिओ नीतीन पटेल यांनी उपचार केले आहेत. मात्र अजून रोहितच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
रोहितचे या मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याला नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती.
रोहित सध्या चांगल्या लयीत असून 2019 या वर्षात तो 1490 धावांसह वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्यामुळे आता या नवीन वर्षातही हीच लय कायम राखण्याचा रोहितचा प्रयत्न असणार आहे. पण त्याआधी त्याला झालेली दुखापत किती गंभीर आहे, हे पहावे लागेल.






