लखनऊ। गुरुवारी (२४ फेब्रुवारी) भारत विरुद्ध श्रीलंका संघात (India vs Sri Lanka) ३ टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना (1st T20I) पार पडला. भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने ६२ धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, हा सामना भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासाठी देखील वैयक्तिकरित्या खास ठरला आहे.
रोहितचा विश्वविक्रम
एकाना स्टेडियमवर पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. भारताकडून रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली. त्यांनी १११ धावांची भागीदारी सलामीला रचली. यामध्ये रोहितने ३२ चेंडूत २ चौकार आणि १ षटकारासह ४४ धावांची खेळी केली.
या खेळीमुळे रोहित आता आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने याबाबतीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्टील (Martin Guptill) आणि भारताचा विराट कोहली (Virat Kohli) यांना मागे टाकले आहे (Most runs in T20I).
रोहितच्या आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये आता १२३ सामन्यांतील ११५ डावात ३३.०७ च्या सरासरीने ३३०७ धावा झाल्या आहेत. यामध्ये त्याच्या ४ शतकांचा आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० धावा करण्याबाबत रोहितपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर गप्टील असून त्याच्या १०८ डावात ३२९९ धावा आहेत. तसेच तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराटच्या आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ८९ डावात ३२९६ धावा आहेत. विशेष म्हणजे हे तीनच खेळाडू सध्या असे आहेत, ज्यांच्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ३००० पेक्षा अधिक धावा झाल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजीत सचिन-रोहितची बादशाहत
रोहित आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत अव्वलस्थानी आल्याने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही क्रिकेट प्रकारात भारतीय फलंदाजांची बादशाहत पाहायला मिळत आहे. कारण कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावाववर आहे. सचिनने कसोटीत सर्वाधिक १५९२१ धावा केल्या आहेत. तसेच वनडेत १८४२६ धावा केल्या आहेत.
भारताने जिंकला सामना
गुरुवारी रोहित बाद झाल्यानंतर इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी ताबडतोड फलंदाजी करताना अर्धशतके झळकावली. इशानने ८९ आणि श्रेयसने नाबाद ५७ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने २० षटकात २ बाद १९९ धावा केल्या आणि श्रीलंकेला २०० धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला २० षटकात ६ बाद १३७ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून चरिथ असलंकाने नाबाद ५३ धावांची खेळी केली. पण अन्य फलंदाज खास काही करण्यात अपयशी ठरले. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि वेंकटेश अय्यरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच युजवेंद्र चहल आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
पहिले षटक आणि भुवीची विकेट! निसंकाला गोल्डन डकवर बाद करताच भुवनेश्वरची अनोख्या विक्रमाला गवसणी
क्रिकेटच्या डॉनने २१ वर्षांपूर्वी घेतलेला अखेरचा श्वास, वाचा त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी