भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा हा आपल्या आक्रमक खेळांसाठी संपूर्ण क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहे. आपल्या सुरुवातीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत फार यशस्वी न ठरलेला रोहित 2013 पासून एका वेगळ्याच शैलीत क्रिकेट खेळत आहे. मात्र रोहितसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणे ही सोपी बाब नव्हती. सर्वसामान्य परिस्थितीत वाढलेल्या रोहितने जीवनात प्रचंड संघर्ष केलेला आहे. रोहितच्या वडिलांकडे आर्थिक अडचणी असल्यामुळे तो आपल्या आजी-आजोबांसोबत राहत होता.
रोहितच्या जीवनावर वरिष्ठ पत्रकार रेहान फजल यांनी बीबीसी हिंदीच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना माहिती दिली आहे. एका ऑनलाईन कार्यक्रमादरम्यान फजल म्हणाले, ‘रोहित हा एक सर्वसामान्य कुटुंबातून येतो. त्याच्या वडिलांचे नाव गुरुनाथ शर्मा असे आहे. रोहितच्या वडिलांना कायम आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. रोहितचे वडील हे एका वाहतूक कंपनीत कामाला होते. रोहितची आई ही विशाखापट्टनम येथील आहे. रोहितला त्याच्या काकांनी आर्थिक मदत केली व 50 रुपयांच्या खर्चात त्याने क्रिकेट प्रशिक्षणास सुरुवात केली.’
‘रोहितला सुरुवातीच्या काळात फिरकीपटू गोलंदाज बनायचे होते, मात्र प्रशिक्षक दिनेश लाड यांच्यामुळे रोहितने फलंदाजीकडे लक्ष केंद्रित केले. दिनेश लाड यांनी रोहितला आपली शाळा बदलण्यास सांगितले. रोहितने स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रवेश घेतला, शाळेची फी प्रचंड होती मात्र, रोहितला स्कॉलरशिप देण्यात आली होती.’
फजल पुढे म्हणाले, ‘मुंबईमध्ये शालेय पातळीवरील हॅरीस शिल्ड टूर्नामेंट होते. यामध्ये रोहितने शानदार कामगिरी केली. यानंतर रोहितला मुंबईच्या 17 वर्षांखालील संघात निवडण्यात आले. 2006 सालच्या देवधर ट्रॉफीमध्ये रोहितने अंतिम सामन्यात शानदार शतक झळकावले होते. रोहितने त्या दिवशी 122 चेंडू 142 धावांची शानदार खेळी केली होती. रोहितने 2006 सालीच आपले प्रथम श्रेणी पदार्पण केले व 2007 साली त्याला आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण करण्याची संधी मिळाली.’
रोहितने 2007 साली आयर्लंड विरुद्ध आपले एकदिवसीय पदार्पण केले व 2013 साली मोठ्या परिश्रमानंतर त्याला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. रोहित सध्या भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार असून संपूर्ण क्रिकेट विश्वात त्याने आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘असा’ करायचा ट्रोलिंगचा सामना, पृथ्वी शॉने सांगितला मार्ग
‘द वॉल’ राहुल द्रविड का ठरु शकतो भारतीय क्रिकेट संघाचा उत्तम प्रशिक्षक, वाचा ३ प्रमुख कारणे
टीम साऊदीने कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी सुरू केला माईंड गेम; केले ‘हे’ मोठे भाष्य