येत्या जून महिन्यामध्ये टीम इंडिया टी20 विश्वचषक खेळणार आहे. या स्पर्धेसाठी रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार आहे. काही रिपोर्ट्सनुसार, विश्वचषक संपल्यानंतर रोहित शर्मा टी20 आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करेल. यामागचं मुख्य कारण हार्दिक पांड्या असल्याचं बोललं जात आहे.
‘दैनिक जागरण’च्या वृत्तानुसार, बीसीसीआय हार्दिक पांड्याला टी20 संघाचा कर्णधार बनवू इच्छित आहे. यासाठीच त्याला विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आलं. याशिवाय रोहित शर्माकडे छोट्या फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची ही शेवटची संधी आहे. कारण आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सनं आधीच त्याला कर्णधार पदावरून हटवून हार्दिक पांड्याकडे नेतृत्व दिलं आहे.
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, 10 वर्ष मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेला रोहित शर्मा आणि सध्याचा कर्णधार हार्दिक पांड्या यांच्यात कोणतीही केमिस्ट्री दिसलेली नाही. मुंबईनं ऑक्टोबर 2023 मध्ये हार्दिक पांड्यासोबत करार केला आणि 15 डिसेंबर 2023 रोजी त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. तेव्हापासून दोघांमध्ये सर्वकाही ठीक नाही. आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरीही खूपच खराब राहिली आणि संघ प्लेऑफच्या शर्यतीतून सर्वात प्रथम बाहेर पडला. यामुळे चाहते देखील नाराज आहेत.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 2022 टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. यानंतर रोहित आणि विराट कोहलीनं 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर लक्ष केंद्रित केलं. त्यादरम्यान टी20 संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली होती. त्यानं न्यूझीलंडमध्ये आणि घरच्या भूमीवर श्रीलंकेविरुद्ध भारताचं नेतृत्व केलं. असं मानलं जात होतं की, आता हार्दिक पांड्या भारताच्या टी20 संघाचं पूर्णवेळ नेतृत्व करेल. परंतु इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान बीसीसीआयनं रोहित शर्माला टी20 विश्वचषकासाठी कर्णधार म्हणून घोषित केलं आणि हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं.
रोहित शर्मा सध्या 37 वर्षांचा आहे. तर हार्दिक पांड्या अजूनही 30 वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत, भविष्याचा विचार करून, बीसीसीआय हार्दिक पांड्याला किमान टी20 संघाचा कर्णधार बनवण्याचा विचार करत आहे. तसंही हार्दिक पांड्या सध्या भारतासाठी फक्त मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळत आहे.
रोहित शर्मानं नोव्हेंबर 2022 पासून भारतासाठी जास्त टी20 क्रिकेट खेळलंच नाही. 2024 च्या टी20 विश्वचषकापूर्वी त्यानं तीन सामने खेळले, ज्यामध्ये तो दोनदा शून्यावर बाद झाला. तर एका सामन्यात त्यानं शतक झळकावलं. तसेच आयपीएल 2024 मध्येही रोहित शर्माचा फॉर्म फारसा काही चांगला राहिलेला नाही. या सर्व बाबींचा विचार करता, रोहित शर्मा टी20 विश्वचषकानंतर टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करेल, अशीच शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीनं रविवारी चेपॉकमध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला? ‘गार्ड ऑफ ऑनर’ नंतर निवृत्तीच्या चर्चांना वेग
‘डिप्रेशन’ मधून बाहेर पडून बनला स्टार, आरसीबीमध्ये येताच पालटलं यश दयालचं नशीब!, जाणून घ्या आकडेवारी
सलग 5 विजयानंतर अशी आहेत आरसीबीसाठी ‘प्लेऑफ’ची समीकरणं, कोणत्या संघाचा पत्ता होणार कट?