स्फोटक फलंदाज रिंकू सिंहचं नाव टी20 विश्वचषकाच्या अंतिम 15 खेळाडूंमध्ये नाही, यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या दरम्यान एक फोटो समोर आला, ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा रिंकू सिंहसोबत दिसत आहे. फोटोमध्ये रिंकू काहीतरी बोलत असून रोहित उभा राहून त्याचं बोलणं ऐकत असल्याचं दिसतंय.
हा फोटो सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला. चाहते यावर कमेंट करून रोहित शर्माचं कौतुक करत आहेत. चाहत्यांना रोहितचं हे वागणं फार आवडलं आहे. 2024 टी20 विश्वचषकासाठी दोन दिवसांपूर्वी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. या टीममध्ये रिंकू सिंहचं नाव नाही. त्याचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आलाय.
रिंकूची आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्सचा पुढचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. गुरुवारी केकेआरचा संघ सरावासाठी मैदानावर पोहोचला होता. यादरम्यान रोहित शर्मानं रिंकू सिंहची भेट घेतली. कोलकाता नाईट रायडर्सनं त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो पोस्ट केला आहे. पोस्टच्या कमेंट्समध्ये लोकांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत.
गुरुवारी संध्याकाळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रिंकू सिंहबाबत प्रश्न विचारण्यात आले. पत्रकार परिषदेत आगरकर म्हणाले, “रिंकूची निवड न करणं हा सर्वात कठीण निर्णय होता. त्यानं काहीही चूक केलेली नाही. शुबमन गिलचीही चुकी नव्हती. या दोघांना वगळण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र टीम कॉम्बिनेशनमुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.”
आयपीएलच्या या हंगामातील सरासरी कामगिरीमुळे रिंकूला बाहेर बसावं लागलं का? असा प्रश्नही उपस्थित केला गेला. मात्र आगरकर यांनी यावर अतिशय स्पष्ट उत्तर दिलं. आगरकर म्हणाले, “निवड समिती आणि कर्णधार रोहित शर्मा यांना काय हवं आहे याबाबत स्पष्टता होती. आयपीएलमधील खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीचा यावर काही प्रभाव नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकाचं काउंटडाउन सुरू, आयसीसीनं रिलिज केलं स्पर्धेचं अधिकृत गाणं