आशिया खंडातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेला आशिया चषक २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) येथे खेळला जाणार आहे. आशिया खंडातील प्रमुख संघ या स्पर्धेत सहभागी होतील. चार वर्षांनी होत असलेल्या या स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपली कंबर कसली आहे. २०१६ नंतर प्रथमच टी२० प्रकारात आशिया चषक खेळला जाईल. आगामी टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने या स्पर्धेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
या आशिया चषकातील भारत पाकिस्तान सामन्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून, २८ ऑगस्ट रोजी हा सामना खेळला जाईल. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा ‘मिशन ८९’ घेऊन मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्याचे हे मिशन ८९ यशस्वी झाल्यास भारतीय संघ देखील विजयी पताका उभारेल. हे मिशन ८९ काय आहे याबाबत देखील आपल्याला जाणून घ्यायला हवे.
मिशन ८९ म्हणजे रोहित शर्मा हा आणखी ८९ धावा केल्यानंतर आशिया चषकात सर्वाधिक धावा काढणारा भारतीय फलंदाज बनेल. रोहितच्या नावे आत्ता ८८३ धावा असून, आशिया चषकात सर्वाधिक धावा काढणारा भारतीय सचिन तेंडुलकर आहे. सचिनने आपल्या कारकीर्दीत आशिया चषकात ९७१ धावा केल्या होत्या. रोहितने पहिल्याच सामन्यात या धावा केल्या तर भारतीय संघाला विजय मिळण्याची देखील मोठी शक्यता आहे.
आशिया चषकातील सर्वात यशस्वी फलंदाजांची यादी काढायची झाल्यास श्रीलंकेचे सनथ जयसूर्या (१२२० धावा) व कुमार संगकारा (१०७५ धावा) अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर भारताचा सचिन तेंडुलकर (९७१ धावा), पाकिस्तानचा शोएब मलिक (९०७ धावा), भारताचे रोहित शर्मा (८८३ धावा) व विराट कोहली (७६६ धावा) यांचा क्रमांक लागतो.
आशिया चषक आत्तापर्यंत १४ वेळा खेळला गेला आहे. यामध्ये भारताचे वर्चस्व दिसून येते. कारण, भारताने तब्बल सात वेळा आशिया चषकावर कब्जा केला आहे. त्यानंतर श्रीलंकेने पाच आणि पाकिस्तानने दोन वेळा आशा चषक जिंकला आहे. भारत गतविजेता म्हणून या स्पर्धेत सहभागी होईल.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थान रॉयल्सच्या ‘या’ खेळाडूची लॉटरी, जायबंदी वेगवान गोलंदाजाच्या जागी आशिया चषकासाठी निवड?
Asia Cup 2022 | ‘या’ पाच कर्णधारांनी जिंकले आहेत सर्वाधिक सामने, यादीत एका भारतीयाचाही समावेश