अहमदाबाद। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात सध्या ३ सामन्यांची वनडे मालिका होत आहे. ही मालिका नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असून या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (९ फेब्रुवारी) होणार आहे. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला (Rohit Sharma) एक मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे.
रोहित टाकू शकतो धोनीला मागे
रोहित भारतात सर्वाधिक वनडे षटकार मारण्याच्या बाबतीत माजी कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) मागे टाकत अव्वल क्रमांकावर येऊ शकतो. सध्या रोहितच्या नावावर भारतात ६९ वनडे सामन्यात ११६ षटकार आहेत. रोहितने हे सर्व सामने भारताकडून खेळले आहेत (Most ODI Sixes in India).
तसेच धोनीने भारतात खेळताना वनडेमध्ये १३० सामन्यांत १२३ षटकार मारले आहेत. धोनीने यातील १२७ सामने भारताकडून खेळले आहेत, तर ३ सामने आशिया एकादश संघाकडून खेळले आहेत. धोनीने भारताकडून भारतात खेळलेल्या १२७ वनडे सामन्यांमध्ये रोहित इतकेच म्हणजे ११६ षटकार मारले आहेत.
त्यामुळे, रोहितला भारतात सर्वाधिक वनडे षटकार मारण्याच्या बाबतीत धोनीला मागे टाकायचे असेल, तर अजून ८ षटकार मारावे लागतील. तसेच भारताकडून भारतात खेळताना सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर येण्यासाठी रोहितला अजून केवळ एकाच षटकाराची गरज आहे.
भारतात सर्वाधिक वनडे षटकार मारण्याच्या बाबतीत सध्या धोनी आणि रोहित पाठोपाठ सचिन तेंडुलकर आहे. त्याने १६४ सामन्यांत ७१ षटकार मारले आहेत, तर चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या युवराज सिंगने भारतात वनडेमध्ये ६५ षटकार मारले आहेत. यापाठोपाठ ५८ षटकारांसह सौरव गांगुली पाचव्या आणि ५७ षटकारांसह विराट कोहली सहाव्या क्रमांकावर आहे.
वनडेमध्ये भारतात सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू
१२३ षटकार – एमएस धोनी (१३० सामने)
११६ षटकार – रोहित शर्मा (६९ सामने)
७१ षटकार – सचिन तेंडुलकर (१६४ सामने)
६५ षटकार – युवराज सिंग (१११ सामने)
५८ षटकार – सौरव गांगुली (८० सामने)
५७ षटकार – विराट कोहली (९९ सामने)
वनडेमध्ये भारताकडून भारतात सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू
११६ षटकार – एमएस धोनी (१२७ सामने)
११६ षटकार – रोहित शर्मा (६९ सामने)
७१ षटकार – सचिन तेंडुलकर (१६४ सामने)
६३ षटकार – युवराज सिंग (१०८ सामने)
५७ षटकार – सौरव गांगुली (७८ सामने)
५७ षटकार – विराट कोहली (९९ सामने)
महत्त्वाच्या बातम्या –
IPL Memories| ‘कोण हा शाहरुख खान?’ आयपीएल ऑक्शनर रिचर्ड मेडलींनी पत्रकारांनाच केलेला प्रतिप्रश्न
शिखर धवन, श्रेयस अय्यरची कोरोना टेस्ट तर निगेटिव्ह, पण खेळणार का दुसरा वनडे?
कारकीर्द वाचवण्यासाठी पुजाराने घेतला मोठा निर्णय! वाचा सविस्तर