भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान इंग्लडचा फलंदाज बेन डकेटनं एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या वेगवान फलंदाजीचं श्रेय इंग्लंडला मिळायला हवं, असं डकेट म्हणाला होता. डकेटच्या मते, यशस्वी जयस्वाल इंग्लंडच्या संघाप्रमाणे ‘बेसबॉल’ पध्दतीनं फलंदाजी करतो. तसेच त्यानं इंग्लंडच्या संघाला खेळताना पाहून ही शैली आत्मसात केल्याचं तो म्हणाला होता. इंग्लिश फलंदाजाच्या या टिप्पणीवर अनेक दिग्गजांनी टीका केली आहे. आता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं देखील पत्रकार परिषदेत डकेटला चोख प्रत्युत्तर दिलं. रोहितनं ऋषभ पंतचं नाव घेऊन डकेटला उत्तर दिलं आहे. (Rohit Sharma on Ben Duckett).
“आमच्या संघात ऋषभ पंत नावाचा एक खेळाडू होता. बेन डकेटनं त्याला कदाचित खेळताना पाहिलं नसेल.”, असं खरमरीत उत्तर रोहितनं डकेटला दिलं. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यानं आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं भारताला अनेक वेळा संकटातून बाहेर काढलंय. 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ‘गाबा’ कसोटीत मिळवलेला विजय हा विशेष लक्षात राहण्यासारखा. या कसोटीत पंतनं शेवटच्या दिवशी नाबाद 89 धावांची खेळी करून टीम इंडियाला रोमहर्षक विजय मिळवून दिला होता.
भारत आणि इंग्लंड यांच्यात 7 मार्चपासून धरमशाला येथे पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. भारतातील अन्य खेळपट्टींप्रमाणे धर्मशालाची पिच देखील फिरकीपटूंसाठी लाभदायक असल्याचं बोललं जातंय. पत्रकार परिषदेदरम्यान रोहितनं यावर आपली प्रतिक्रिया दिली.
“टर्निंग पिच असो किंवा इतर कोणतीही पिच, आमचा हेतू विजयाचाच असतो. रँक टर्नरवर दोन्ही संघांसाठी फायदे आणि तोटे आहेत. माझ्यासाठी, मालिका जिंकणं अधिक समाधानकारक आहे. आम्ही या मालिकेत चांगलं पुनरागमन केलं”, असं रोहित यावेळी म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
BCCI च्या करारातून श्रेयस-इशानला वगळल्यानंतर रोहितची पहिली प्रतिक्रिया, सक्त ताकीद देत म्हणाला…
आयपीएलमध्ये ‘सूर्या’ तळपणार! शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सुरू केली बॅटिंग
धरमशाला कसोटीत इंद्रदेव येईल ‘साहेबां’च्या मदतीला? जाणून घ्या हवामानाचा अंदाज