ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसऱ्या सामन्याचा निकाल काही लागला नाही. टीम इंडिया या सामन्यात मोठ्या पराभवापासून बचावली असली तरी चाहत्यांना मात्र नक्कीच मोठा धक्का बसला आहे.
भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. दरम्यान, सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्मा यानं अश्विनसह अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराबाबतही आपलं मत मांडलं. यावेळी हिटमॅनची विनोदी शैली पुन्हा एकदा पाहायला मिळाली.
वास्तविक, पत्रकार परिषदेत जेव्हा रोहित शर्माला चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि अश्विन आता वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत का? असं विचारण्यात आलं, तेव्हा रोहित शर्मा म्हणाला, “अरे भाऊ, फक्त अश्विननेच निवृत्ती घेतली आहे. तुम्ही लोक मला मारून टाकाल. रहाणे-पुजारा अजूनही खेळत असून ते चांगली कामगिरी करून संघात पुनरागमन करू शकतात.” रोहितचं हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित सर्वजण हसू लागले.
यावेळी रोहित शर्मा त्याच्या सध्याच्या खराब कामगिरीवरही बोलला. रोहित म्हणाला, “मी चांगली फलंदाजी केली नाही, हे मान्य करायला हरकत नाही. जोपर्यंत माझं शरीर, मन आणि पाय व्यवस्थित चालत आहेत, तोपर्यंत मी खेळत राहीन. मला सध्या खेळताना छान वाटत आहे.”
रोहित शर्मानं हा सामना वाचवण्याचं श्रेय केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांना दिलं. टीम इंडियाच्या पहिल्या इनिंगमध्ये यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शुबमन गिल, रोहित शर्मा, रिषभ पंत यांसारखे सर्व प्रमुख फलंदाज पूर्णपणे फ्लॉप झाले होते. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ सहज सामना जिंकेल असं वाटत होतं. पण केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्या शानदार खेळीमुळे टीम इंडिया फॉलोऑनपासून वाचली.
तीन सामन्यांनंतर सध्या मालिका 1-1 ने बरोबरीत असून चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळला जाईल.
हेही वाचा –
3 खेळाडू जे भारतीय कसोटी संघात आर अश्विनची जागा घेऊ शकतात
अश्विनच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने शेअर केला एक खास व्हिडिओ! अश्विन म्हणाला, “आयुष्य ही खरोखरच…”
‘त्याच्या निर्णयावर खूप…’, आर अश्विनच्या निवृत्तीवर रोहित शर्माची प्रतिक्रिया