भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने २३ जून २००७ ला आयर्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यातून पदार्पण केले होते. मात्र पदार्पणाच्या सामन्यात त्याला फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.
रोहितने जरी २००७ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असले तरी मात्र त्याला अधिक प्रसिद्धी ही २०१३ नंतर भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाकडून नियमित सलामीवीर फलंदाज म्हणून खेळायाला सुरुवात केल्यानंतर मिळाली.
रोहितला त्याच्या पदार्पणानंतरही ६ वर्षे बराच संघर्ष करावा लागला. रोहितने त्याच्या पदार्पणापासून ३१ डिसेंबर २०१२ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२१ सामने खेळले होते. यात त्याला केवळ ३०.२२ च्या सरासरीने २५०९ धावा करता आल्या होत्या. तसेच त्याने फक्त २ शतके आणि १७ अर्धशतके केली होती.
विशेष म्हणजे या ६ वर्षात त्याला कसोटी पदार्पणही करता आले नव्हते. २०१२ ला जूलै-ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालकेत तर त्याला ५ सामन्यात एकदाही ६ किंवा त्यापेक्षा अधिक धावा करता आल्या नव्हत्या. त्यापूर्वी खराब कामगिरीमुळे त्याला २०११ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघातही संधी मिळाली नव्हती.
मात्र रोहितने नंतर जबरदस्त पुनरागमन केले. २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी त्याला नियमित सलामीवीर म्हणून मिळालेल्या संधीनंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याने यानंतर एक दिग्गज सलामीवीर फलंदाज म्हणून आज नाव कमावले आहे.
रोहितने १ जानेवारी २०१३ पासून आत्तापर्यंत ८ वर्षात २५५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४८.८९ च्या सरासरीने १२१७५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या तब्बल ३८ शतकांचा आणि ६० अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच या ८ वर्षात त्याने वनडेत ३ द्विशतके करण्याचाही कारनामा केला.
एवढेच नाही, तर या ८ वर्षांची आकडेवारी लक्षात घेतली तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून विराट कोहलीनंतरचा सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू आहे. विराटने गेल्या ८ वर्षात ३१० सामन्यांत ५९.४६ च्या सरासरीने १७४८३ धावा केल्या आहेत.