आयपीएल 2025 (IPL 2025) च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो का आयपीएलमधील सर्वात घातक फलंदाजांपैकी एक आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना रोहितने 81 धावांची जबरदस्त खेळी करत संघाला निर्णायक विजय मिळवून दिला. या खेळीसाठी त्याला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सामन्यानंतर रोहितने आपल्या फलंदाजीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, “या हंगामात मी आतापर्यंत फक्त चार अर्धशतकं झळकावली आहेत. अजून काही फिफ्टी केल्या असत्या तर निश्चितच चांगलं वाटलं असतं. मात्र हा दिवस संघासाठी खूप महत्त्वाचा होता. संपूर्ण संघाने चांगली कामगिरी केली आणि त्यामुळे आनंद वाटतो.”
रोहितने आपल्या खेळीमध्ये मिळालेल्या संधींचाही उल्लेख केला. “मी आधीही असेच (आक्रमक शैली) शॉट्स खेळले आहेत, पण त्यावेळी मी बाद झालो होतो. आज मात्र काही झेल ड्राॅप झाले. मला नशिबाची साथ मिळाली. काही वेळा यश मिळवण्यासाठी नशिबाचीही गरज असते, आणि आज माझ्यासाठी तसाच दिवस होता,” असे रोहित म्हणाला.
दव आल्याने गोलंदाजांसाठी परिस्थिती कठीण होती, मात्र त्यांनीही संयम दाखवत चांगली कामगिरी केली, असेही रोहितने नमूद केले. जॉनी बेयरस्टोसोबत सलामी देण्याबाबत रोहित म्हणाला, “त्याला या फॉरमॅटमध्ये खूप अनुभव आहे. त्याच्यासोबत खेळणं म्हणजे खास अनुभव होता.”
या शानदार खेळीमुळे रोहितने आयपीएल कारकिर्दीतील 21वा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे, रोहित आता आयपीएल इतिहासातील प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकणाऱ्या वयस्कर खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
आयपीएलमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारे वयस्कर खेळाडू
अनिल कुंबळे (38 वर्ष 219 दिवस)
ब्रॅड हॉग (38 वर्ष 144 दिवस)
रोहित शर्मा (38 वर्षे 030 दिवस)






