अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी उत्कृष्ट सुरुवात करून दिली. तसेच या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. रोहित शर्माने अर्धशतक झळकावले. त्याने अवघ्या ३४ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकार मारत ६४ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मार्टिन गप्टीलला मागे टाकत दुसरा क्रमांक गाठला आहे.
रोहितने आता १११ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४ शतके आणि २२ अर्धशतकांसह २८६४ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याने मार्टिन गप्टीलला मागे टाकले आहे. गप्टीलने ९९ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २८३९ धावा केल्या आहेत. तसेच या यादीत अव्वल क्रमांकावर असलेल्या भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर ९० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ३१५९ धावा आहेत.
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१)विराट कोहली : ३१५९ धावा (भारत)
२) रोहित शर्मा : २८६४ (भारत)
३) मार्टिन गप्टील: २८३९(न्यूझीलंड)
४) आरोन फिंच :२३४६ (ऑस्ट्रेलिया)
५)शोएब मलिक: २३३५ (पाकिस्तान)
भारताच्या २२४ धावा
पाचव्या टी२० सामन्यात भारताकडून रोहित व्यतिरिक्त विराटने नाबाद ८० धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच सुर्यकुमार यादवने ३२ आणि हार्दिक पंड्याने ३९ धावांची आक्रमक खेळी केली. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २ बाद २२४ धावा करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
कहर कॅच! जॉर्डन-रॉयने बाऊंड्री लाईनजवळ घेतला असा अफलातून झेल की सूर्यकुमार बघतच राहिला
‘सलामीवीर’ विराट! आत्तापर्यंत सलामीला फलंदाजी करताना अशी आहे कोहलीची कामगिरी
वनडे मालिकेत ‘हा’ गोलंदाज नसणार इंग्लंड संघाचा भाग?