बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना भारतासाठी निराशाजनक ठरला. 26 डिसेंबरपासून सुरू झालेला हा रोमांचक सामना पाच दिवस चालला, ज्यामध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्कारावा लागला. मेलबर्न कसोटीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली, परंतु अखेर ऑस्ट्रेलियानं बाजी मारली. या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “हा पराभव खूपच निराशाजनक आहे. आम्ही मैदानावर लढण्याची इच्छाशक्ती गमावली असं नाही. आम्ही शेवटपर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले, पण दुर्दैवानं आम्हाला यश मिळू शकलं नाही. कसोटी सामन्यादरम्यान आम्हाला अनेक संधी मिळाल्या, पण त्यांचा फायदा उठवण्यात आम्ही अपयशी ठरलो.”
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाचा संदर्भ देताना रोहित म्हणाला, “आम्ही त्यांना 90/6 पर्यंत रोखलं, पण त्यांच्या खालच्या फळीतील भागीदारीमुळे आम्हाला त्रास झाला. आम्हाला माहित आहे की कसोटी क्रिकेटमध्ये परिस्थिती कठीण असू शकते. परंतु आम्हाला या परिस्थितीत चांगली कामगिरी करायची आहे.”
रोहित शर्मानं युवा फलंदाज नितीश कुमार रेड्डीचं कौतुक केलं आणि म्हणाला, “तो पहिल्यांदाच इतक्या कठीण परिस्थितीत खेळत होता आणि त्यानं उत्तम तंत्र आणि चारित्र्य दाखवलं. भविष्यात तो आणखी चांगली कामगिरी करेल असा मला विश्वास आहे. संघ त्याच्या पाठीशी उभा आहे.”
याशिवाय जसप्रीत बुमराहचं कौतुक करताना रोहित म्हणाला, “बुमराहनं नेहमीप्रमाणेच चमकदार कामगिरी केली. तो आकडेवारीकडे लक्ष देत नाही, त्याला फक्त देशासाठी खेळायचं आहे आणि संघासाठी चांगली कामगिरी करायची आहे. पण, दुर्दैवानं त्याला दुसऱ्या टोकाकडून फारशी साथ मिळू शकली नाही.”
या विजयासाह ऑस्ट्रेलियानं मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. भारतानं शेवटच्या सत्राची सुरुवात 112/3 अशी केली, पण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना रिषभ पंत बाद झाला जो खेळाचा टर्निंग पॉइंट ठरला. यानंतर भारतीय फलंदाज एकामागून एक बाद होत गेले आणि अवघ्या 34 धावांत संपूर्ण संघानं शेवटच्या सात विकेट गमावल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाज स्कॉट बोलँड आणि नॅथन लायन यांनी चमकदार कामगिरी करत भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या.
हेही वाचा –
या 3 खेळाडूंमुळे मेलबर्न कसोटीत भारताचा पराभव झाला, सविस्तर जाणून घ्या
मेलबर्नमध्ये भारताचा पराभव, आता टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार?
मेलबर्नमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव, मालिकेत ऑस्ट्रेलियाची आघाडी