इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामात ५ वेळचे आयपीएल विजेते मुंबई इंडियन्स संघ पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळणार आहे. दरम्यान, या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी विविध विषयांवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मुंबईसाठी ही असेल सलामी जोडी
बुधवारी (२३ मार्च) रोहित आणि जयवर्धने पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आगामी आयपीएल हंगामासाठी (IPL 2022) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सलामी जोडीबद्दल आपले मत मांडले आहे. रोहितने सांगितले आहे की, ‘मी सलामीला फलंदाजी करणार आहे. मी यापूर्वीही सलामीला फलंदाजी केली आहे, त्यामुळे मी इशान किशन बरोबर सलामीला फलंदाजी करण्यास उत्सुक आहे.’ इशान किशनला मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ लिलावातून १५.२५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
माहेला जयवर्धनेने (Mahela Jayawardena) देखील रोहित (Rohit Sharma) आणि इशान (Ishan Kishan) यांच्या सलामी जोडीवर विश्वास दाखवला आहे. तो म्हणाला, ‘वरच्या फळीत रोहित आणि इशान यांची चांगली मिश्रण आहे. इशान यष्टीरक्षक देखील आहे आणि असे खूप कमी आहेत, जे वरच्या फळीत फलंदाजी करू शकतात.’
याबरोबर रोहित त्याच्या कामाच्या ताणाबद्दल म्हणाला, ‘नक्कीच मी सर्व सामने खेळणार आहे, म्हणूनच मी इथे बसलो आहे. सध्या तरी कोणतीही समस्या नाही. मी सर्व सामने खेळण्यास आणि चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे. जर काही काळजी करण्याची वेळ आली, तर त्यावर त्यावेळी निर्णय घेतला जाईल.’
सुर्यकुमारच्या उपलब्धतेबद्दल दिली माहिती
फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेदरम्यान मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव यांच्या (Suryakumar Yadav) अंगठ्याला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे तो सध्या बंगळुरूमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) त्यावर काम करत आहे. त्यामुळे तो आयपीएल २०२२ मधील मुंबईचे सुरुवातीचे सामने मुकण्याची शक्यता आहे. याबद्दलही रोहितने भाष्य केले आहे.
रोहित म्हणाला, ‘सुर्या सध्या एनसीएमध्ये आहे. तो बरा होत आहे. तो लवकरच इथे येईल. मी आत्ता त्याच्या उपलब्धतेबद्दल काही सांगू शकत नाही की, तो पहिला सामना खेळणार आहे की नाही. पण आम्ही एनसीएकडून त्याला मंजुरी मिळताच लवकरात लवकर इकडे आणण्याचा प्रयत्न करू.’
Can't wait to see you soon, SKY! ????
RO reveals @surya_14kumar's arrival status! ????️#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @ImRo45 @MahelaJay MI TV pic.twitter.com/rMvpBq7d7y
— Mumbai Indians (@mipaltan) March 23, 2022
नव्या खेळाडूंवर विश्वास
मेगा लिलावामुळे संघ नव्याने बांधले गेले आहेत, त्याचमुळे आता मुंबईत जसप्रीत बुमराहला साथ देण्यासाठी (Jasprit Bumrah) ट्रेंट बोल्ट आणि ऍडम मिल्ने हे खेळाडू नाहीत. असे असले तरी संघात नवीन आलेल्या खेळाडूंबद्दल रोहितने विश्वास व्यक्त केला आहे.
तो म्हणाला, ‘टायमल मिल्स, जयदेव उनाडकट हे संघात नवीन आहेत, पण ते या खेळात नवीन नाही. ते गेली अनेक वर्षे खेळत आहेत आणि त्यांना माहित आहे काय करायचे आहे. त्यामुळे एक संघ म्हणून त्यांनी आमच्यासाठी काय करणे आवश्यक आहे, हे आम्ही त्यांना कसे समजू शकतो यासाठी आमची भूमिका महत्त्वपूर्ण असेल.’
घरच्या मैदानाचा नसेल फायदा
आयपीएल २०२२ मधील साखळी फेरीतील ७० सामने मुंबई आणि पुण्यातील एकूण ४ मैदानांवर होणार आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ५ सामने खेळणार आहे. असे असले तरी मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानाचा फारसा फायदा (Home Advantage) होणार नसल्याचे सांगितले आहे.
रोहित म्हणाला, ‘हा एक नवीन संघ आहे. मला वाटत नाही की, आम्हाला घरच्या मैदानाचा फार फायदा होईल. कारण ७०-८० टक्के खेळाडू यापूर्वी मुंबईत खेळलेले नाही. फक्त मी, सुर्या, पोलार्ड, इशान आणि बुमराह मुंबईमध्ये खूप खेळलो आहे. बाकी कोणी जास्त खेळलेले नाहीत. आम्ही दोन वर्षांनी येथे खेळणार आहोत, आम्ही गेल्या दोन वर्षात एकही सामना मुंबईत खेळलेलो नाही. खरंतर बाकी संघ मागच्यावर्षी मुंबईत खेळले आहेत, पण आम्ही नाही. त्यामुळे फायदा होणार नाही.’
???????????????????????????? ???????????????????????? on what he thinks about #MumbaiIndians having an advantage while playing in Mumbai and Pune ????#OneFamily #DilKholKe @ImRo45 @MahelaJay MI TV pic.twitter.com/kj31ZY3qff
— Mumbai Indians (@mipaltan) March 23, 2022
तसेच यंदा आयपीएलमध्ये १० संघ खेळणार असल्याने साखळी फेरीसाठी प्रत्येकी ५ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अशाप्रकारे यापूर्वी २०११ साली स्पर्धा खेळवण्यात आली होती. त्यामुळे रोहित म्हणाला की, योग्य योजनेने संघाला पुढे जावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अर्रर्र! झेल घेण्यासाठी धावलेल्या राणा अन् पूजाची जोरदार टक्कर, पुढं जे झालं ते पाहा व्हिडिओत
‘बेबी एबी’ ते हंगारगेकर, ‘या’ ४ अंडर-१९ खेळाडूंवर सर्वांच्या नजरा; तिघांवर लागली कोट्यावधींची बोली






