नुकतीच भारत आणि श्रीलंका संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेतील दुसऱ्या दिवस-रात्र कसोटीत भारताने २३८ धावांनी विजय मिळवत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला आहे. ही मालिका भारताने २-० ने जिंकली आहे. पहिला सामना मोहालीमध्ये, तर दुसरा सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला गेला. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्माने (Rohit Sharma) युवा फलंदाज श्रेयस अय्यरचे (Shreyas Iyer) कौतुक केले आहे. श्रेयसने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ९२ आणि दुसऱ्या डावात ६७ धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा म्हणाला, “श्रेयस अय्यरने संधीचा मोठा फायदा उठवला आहे. त्याला श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मध्ये मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले आणि नंतर शेवटच्या कसोटीत सुद्धा त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. बंगळुरूमध्ये पहिल्या डावात असे वाटले होते की, तो शतकाच्या जवळ आहे, परंतु त्याला दुसऱ्या बाजूने साथ कमी मिळाली. श्रेयस अय्यरला यावेळी संधी देण्यात आली आणि ती त्याने चांगल्या पद्धतीने निभावली. कसोटी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेऐवजी श्रेयसला संघात स्थान देण्यात आले होते. तसेच चेतश्वर पुजाराच्या जागी हनुमा विहारीला संघात स्थान देण्यात आले होते. यादरम्यान श्रेयसने या दोघांची कमी भासू न देता संघाला यश मिळवून देण्यास मदत केली.”
“आम्ही एका संघ म्हणून मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात होतो, जे आम्ही करून दाखवले आहे. मी एक खेळाडू आणि कर्णधार या दोन्ही भूमिकांमध्ये खेळाचा आनंद घेतला आहे,” असेही तो पुढे म्हणाला. रोहितने यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा यांची सुद्धा प्रशंसा केली आहे. तो म्हणाला, “जडेजा सतत उत्तम कामगिरी करत आहे. तो मैदानात एक शानदार क्षेत्ररक्षक म्हणून सर्वोत्तम कामगिरी करत होता. त्याने गोलंदाजीत सुद्धा उल्लेखनीय कामगिरी केली. तो सगळ्याच बाबतीत शानदार खेळाडू ठरला आहे.”
श्रेयस अय्यरबाबत बोलताना तो म्हणाला की, “रहाणे आणि पुजारासारखे खेळणे खूप कठीण काम आहे, परंतु अय्यर कधी निराश होत नाही. या सामन्यात सुद्धा त्याने शानदार प्रदर्शन केले आहे.” रिषभ पंतबाबत रोहित म्हणाला, “त्याच्या यष्टीरक्षणामध्ये खूप आत्मविश्वास दिसतो. तसेच, तो त्याच्या फलंदाजीत सुद्धा सुधारणा करत आहे. यष्टीरक्षक म्हणून इंग्लंड संघाविरुद्ध त्याने चांगली कामगिरी केली होती. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याने धडाकेबाज फलंदाजी केली आहे.”
“तो नेहमीच विजयी कामगिरी करतो. आम्ही जेव्हा त्याला चेंडू देतो, तेव्हा तो कमालीची खेळी खेळतो. आता त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन आणि वर्षांचा सर्वोत्तम खेळ उरला आहे. दिवस-रात्र कसोटीत आम्हाला याबाबत काही माहिती नव्हती, परंतु आम्ही या चेंडूशी परिचित होत आहोत आणि सतत शिकत आहोत,” असेही रोहित पुढे बोलताना म्हणाला.
भारतीय संघाने श्रीलंकेला ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत आणि २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत पराभूत केले करत व्हाईटवॉश दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसीचा श्रेयस अय्यरला सलाम, निवडले फेब्रुवारीतील सर्वोत्कृष्ट खेळाडू; महिलांमध्ये ‘ही’ ठरली विजेती
बंगळुरु टेस्ट : डे-नाईट कसोटीमध्ये भारतीय संघाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, ‘या’ यादीत थेट तिसऱ्या स्थानी
कुठून येतो हा कॉन्फिडन्स? IPL आणि PSL बाबत रमीज राजा यांचे ओपन चॅलेंज पाहून तुम्हीही असंच म्हणाल