मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात गुरुवारी आयपीएलमधील तेरावा सामना पार पडला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने एक कारनामा आपल्या नावावर केला आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकांत ४ बाद १९१ धावा केल्या. यात कर्णधार रोहित शर्माने ४५ चेंडूत ७० धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने पंजाबकडून १६ वे षटक टाकण्यास आलेल्या वेगवान गोलंदाज जेम्स निशमच्या गोलंदाजीवर २ षटकार आणि २ चौकारांसह २१ धावा ठोकल्या. आयपीएलमध्ये आतापर्यंत एका षटकात २० पेक्षा अधिक धावा करण्याची रोहितची ही ८वी वेळ होती.
यापूर्वी त्याने २००८ साली फरविझ महारुफच्या गोलंदाजीवर २६ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याच वर्षी रोहितने गगनदीप सिंगच्या गोलंदाजीवर २१ धावा केल्या होत्या. त्यानंतर २००९ साली मश्रफे मोर्तझाला २१, २०११ साली डॅनियल ख्रिस्टियनला २३, २०१३ साली डेविड हसीला २६, २०१४ साली वरुण ऍरॉनला २४ आणि २०१५ साली अबू नेकिमला एका षटकात २३ धावा ठोकल्या होत्या.
आतापर्यंत आयपीएलमध्ये रोहितने एका षटकात केलेल्या २० पेक्षा अधिक धावा
२६ धावा विरुद्ध फरविझ महारुफ, २००८
२१ धावा विरुद्ध गगनदीप सिंग, २००८
२१ धावा विरुद्ध मश्रफे मोर्तझा, २००९
२३ धावा विरुद्ध डॅनियल ख्रिस्टियन, २०११
२६ धावा विरुद्ध डेविड हसी, २०१३
२४ धावा विरुद्ध वरुन ऍरॉन, २०१४
२३ धावा विरुद्ध अबू नेकिम, २०१५
२१ धावा विरुद्ध जेम्स निशम, २०२०