आगामी टी२० विश्वचषक पुढच्या महिन्यात यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे. सप्टेंबर २००७ मध्ये भारतीय संघाने पहिला टी२० विश्वचषक जिंकला होता. यावेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताच्या युवा संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले होते. भारतीय संघाचा सध्याचा उपकर्णधार रोहित शर्माने या विजयाच्या आठवणीला उजाळा देत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
२००७ टी२० विश्वचषकात खेळलेले जवळपास सर्वच खेळाडूंनी आता निवृत्ती घेतली आहे किंवा ते भारतीय संघाच्या बाहेर आहेत. केवळ एक खेळाडू असा आहे जो २००७ मधील विश्वचषकातही खेळला होता आणि आगामी २०२१ विश्वचषकातही भारतीय संघात खेळणार आहे, तो खेळाडू म्हणजे उपकर्णधार रोहित शर्मा. रोहितने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून ही पोस्ट शेअर केली आहे.
त्याने इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये २००७ टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करणाऱ्या खेळाडूंचा फोटो शेअर केला आहे. त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “२४ सप्टेंबर २००७, जोहान्सबर्ग. तो दिवस, कोट्यावधी लोकांचे स्वप्न पूर्ण झाले होते. त्यावेळी कोणी विचार केला नसेल की, आमच्यासारखा अनुभव नसलेला संघ इतिहास रचेल. या क्षणाला १४ वर्षे झाली आहेत. यानंतर आम्ही एक लांब प्रवास पार केला आहे. आम्ही यादरम्यान अनेकदा इतिहास रचला आहे, तसेच आम्हाला झटकेही लागले आहेत”
रोहितने पुढे लिहिले आहे की, “आम्ही खूप संघर्ष केला आहे, पण त्याने आमच्या धैर्याला तोडले नाही. कारण आम्ही कधी हार मानत नाही. आम्ही आमचे सर्वकाही दिले आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी २० विश्वचषक जिंकण्यासाठी आणि पुन्हा इतिहास रचण्यासाठी आम्ही आमचे सर्वस्व झोकून देणार आहोत. आम्ही येत आहोत आणि ही ट्रॉफी आमची आहे. चला याला शक्य बनवूया”
सध्या रोहित शर्मा आणि इतरही अनेक भारतीय खेळाडू यूएईमध्ये आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने खेळत आहेत. आयपीएल संपल्यानंतर १७ ऑक्टोंबरपासून १४ नोव्हेंबरपर्यंत यूएई आणि ओमानमध्ये टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. यावर्षी विश्वचषक भारतात खेळला जाणार होता. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचे आयोजन यूएई आणि ओमानमध्ये केले गेले आहे. असे असले तरी विश्वचषकाचे आयोजन बीसीसीआयनेच केले आहे. यावर्षी विश्वचषकात एकूण १६ संघ खेळणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बेंगलोरने राजस्थानवर विजय मिळवत मुंबईची केली मदत, प्लेऑफची समीकरणे झाली रंजक; पाहा गुणतालिका
हर्षल पटेलमुळे विराट कोहलीला झाली दुखापत, स्वत: सांगितले मुंबईविरुद्ध खेळताना काय घडले होते?