इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचे सर्वाधिक ५ किताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला यंदाच्या १५व्या हंगामात संघर्ष करावा लागतोय. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये सपाटून पराभवाचं तोंड पाहिलं आहे. बुधवारी (०६ एप्रिल) पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईला ५ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. कोलकाताच्या या विजयात पॅट कमिन्सने मोलाची कामगिरी बजावली. त्याने १५ चेंडूत नाबाद ५६ धावांची आतिषी खेळी केली. कोलकाताविरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने भावूक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
यंदाच्या हंगामात ८ नाही, तर एकूण १० संघ भाग घेत आहेत. अशामध्ये अंतिम चार संघात स्थान बनवण्यासाठी कोणत्याही संघाला आधीपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. या हंगामात सलग ३ वेळा पराभव स्वीकारल्यामुळे मुंबईच्या खात्यात एकही गुण नाहीये. अशात त्यांना लवकरच विजय मिळवावा लागणार आहे.
रोहितची पोस्ट
कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “आम्ही चांगल्या-वाईट परिस्थितीत सोबत राहिलो. हे आमच्या अनेक चांगल्या गोष्टींपैकी एक आहे. तुम्ही अजून काहीही पाहिले नाही.” रोहितचा असा विश्वास आहे की, मागील अनेक वर्षे चांगल्या- वाईट परिस्थितीत एकत्र राहणे ही मुंबई इंडियन्सची सर्वात मोठी ताकद आहे. अशात स्पर्धेत अजूनही खूप काही व्हायचं बाकीये.
सॅम्सचे षटक पडले महागात
कोलकाताविरुद्धच्या सामन्यात १६वे षटक टाकण्यासाठी आलेल्या डॅनियल सॅम्सने तब्बल ३५ धावा दिल्या. त्याचे हे षटक चांगलेच महागात पडले. यातील ३२ धावा कोलकाताकडून फलंदाजी करणाऱ्या पॅट कमिन्सच्या फलंदाजीतून आल्या, तर उर्वरित ३ धावा या अधिकच्या होत्या.
असे असले, तरी मुंबई संघ यापूर्वीही आयपीएलमध्ये सावकाश सुरुवातीनंतर किताब मिळवण्यात यशस्वी झाला आहे. मात्र, यावेळी त्यांचा संघ तितक्या मजबूत अवस्थेत दिसत नाहीये. कोलकाता संघाने मुंबईला अवघ्या १६व्या षटकातच पराभवाचा धक्का दिला. यामुळे मुंबईचा रनरेट खूपच वाईट झाला आहे. मुंबईच्या चाहत्यांना अपेक्षा आहे की, त्यांचा संघ विजय मिळवून लवकरच पुनरागमन करेल.
मुंबई इंडियन्स संघ त्यांचा पुढील सामना येत्या ९ एप्रिल रोजी पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईचा पराभव तर झालाच, पण रोहित शर्माच्या नावावर या नकोशा विक्रमाचीही नोंद, वाचा सविस्तर
MI vs KKR| नितीश राणा अन् जसप्रीत बुमराहला महागात पडली चूक; झाली मोठी कारवाई
IPL 2022 | कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्याचा उडाला रंग, सलग तिसऱ्या पराभवानंतरची रिएक्शन व्हायरल






