ऑस्ट्रेलिया कसोटी कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने बुधवारी (६ एप्रिल) कोलकाता नाइट रायडर्ससाठी जबरदस्त प्रदर्शन करत मुंबई इंडियन्सला पराभवाची धूळ चारली. कमिन्सने अवघ्या १५ चेंडूत ५६ धावा केल्या आणि केकेआरला ४ षटके शिल्लक ठेऊन विजय मिळवून दिला. चार सामन्यांतील केकेआरचा हा तिसरा विजय आहे, तर मुंबई इंडियन्ससाठी हा त्यांचा सलग तिसरा पराभव आहे. कमिन्सने या सामन्यात केलेल्या जबरदस्त प्रदर्शनानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्वतः कमिन्सही या खेळीनंतर हैराण आहे.
पॅट कमिन्स (Pat Cummins) त्याच्या अप्रतिम प्रदर्शनासाठी सामनावीर ठरला. सामना जिंकल्यानंतर कमिन्स म्हणाला की, “मी स्वतः या खेळीमुळे हैराण आहे. या धावा अशाच बनल्या आहेत, मी जास्त काही विचार करत नव्हतो. हे खरंच समाधानकारक आहे. असे वाटत होते की, चेंडू हवेत तरंगत आहे.” यावेळी कमिन्सने केकेआर फ्रेंचायझीचेही आभार मानले, ज्यांनी मेगा लिलावात त्याच्यावर विश्वास दाखवला आणि पुन्हा खरेदी केले.
कमिन्सच्या खेळीमुळे दोन्ही संघांचे कर्णधार चकीत
केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कमिन्सच्या महत्वाच्या खेळीविषयी बोलताना म्हणाला की, ‘मी फक्त चेंडूला हवेत तरंगताना पाहत होतो. मला विश्वास बसत नव्हता. ही त्याची बेजोड खेळी होती. आम्ही आमची रणनीती अंमलात आणायच्या आधीच कमिन्सने सामना जिंकवला.’
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील कमिन्सच्या या खेळीमुळे हैराण आहे. रोहित म्हणाला की, ‘मी त्याच्याकडून अशा प्रकारच्या खेळीची अजिबात अपेक्षा केली नव्हती. तो ज्या पद्धतीने खेळला, पूर्ण श्रेय त्यालाच जाते. फलंदाजीत आमची सुरुवात चांगली झाली नव्हती. आम्ही १५ व्या षटकापर्यंत सामन्यात होतो, पण कमिन्सने सर्व समीकरण बिघडवले.’
आयपीएलच्या इतिहासातील पॅट कमिन्सचे हे तिसरे अर्धशतक आहे. या तीन अर्धशतकांपैकी २ अर्धशतके त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध केले आहेत. आयपीएल २०२० मध्ये त्याने मुंबईविरुद्धचे पहिले अर्धशतक केले होते आणि या सामन्यात दुसरे अर्धशतक केले. कमिन्सने बुधवारी केलेले अर्धशतक आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. यापूर्वी २०१८ मध्ये केएल राहुलने अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक केले होते. आता कमिन्सनेही ही कामगिरी १४ चेंडूंमध्येच केली आहे. या यादीत आता हे दोन दिग्गज संयुक्तरीत्या पहिल्या क्रमांकावर आहेत.