आशिया चषकाचा (Asia Cup) 15वा हंगाम आता शेवटाकडे चालला आहे. यंदा या स्पर्धेत श्रीलंका, अफगानिस्तान या संघांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. तर भारताची कामगिरी निराशाजनक होत आहे. मंगळवारी (6 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध भारताला 6 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. असे झाले असले तरी कर्णधार रोहित शर्मा याने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. हा विक्रम रचताना त्याने सचिन तेंडूलकर याला देखील मागे टाकले आहे.
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आशिया चषकाच्या सुपर फोरमधील त्याच्या दुसऱ्या सामन्यात हा विक्रम केला आहे. दुबई क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रोहितने तुफानी फलंदाजी केली. त्याने 41 चेंडूत 72 धावा केल्या. यामुळे तो आशिया चषकात (वनडे आणि टी20 मिळून) 1000 धावांचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय ठरला. हा पराक्रम करताना त्याने दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याला मागे टाकले आहे. सचिनने आशिया चषकाच्या 23 सामन्यांत 971 धावा केल्या. तर त्याने या धावा फक्त वनडे प्रकारमध्ये केल्या.
रोहितने आशिया चषकाच्या 31 सामन्यांत 1016 धावा केल्या आहेत. यामुळे तो आशिया चषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत श्रीलंकेचा सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) याने 25 सामन्यांत 1220 धावा करत पहिले स्थान काबिज केले आहे, तर कुमार संगकारा हा 24 सामन्यांत 1075 धावा करत दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने 20 सामन्यांत 923 धावा केल्या आहेत.
यूएई येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताने लागोपाठ दोन सामने गमावले आहे. यामुळे गतविजेत्या भारताच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. त्याचबरोबर संघाला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दुसऱ्या संघाच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.
आशिया चषकामध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
1220 – सनथ जयसूर्या
1075 – कुमार संगकारा
1016 – रोहित शर्मा*
971 – सचिन तेंडूलकर
923 – विराट कोहली*
भारताने या स्पर्धेत आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यामधील दोन सामने पाकिस्तान आणि प्रत्येकी एक-एक सामना श्रीलंका आणि हाँगकाँग विरुद्ध खेळले आहेत. यामध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी एका सामन्यात भारताचा पराभव झाला आहे, तर हाँगकाँग आणि पाकिस्तान विरुद्ध विजय मिळाला आहे. तर आता भारताचा एकच सामना खेळायचा शिल्लक आहे. तो सामना 8 सप्टेंबरला अफगानिस्तान विरुद्ध दुबई येथेच खेळला जाणार आहे.