इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने ५० धावांनी विजय मिळवला. या सामन्यातून भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याचे संघात पुनरागमन झाले. त्याला पुनरागमनात मोठी खेळी करता आली नाही, परंतु आपल्या छोटेखानी खेळीसह त्याने विराट कोहली याचा जुना विक्रम मोडित काढला आहे. रोहित असे करणारा पहिलाच भारतीय कर्णधारही बनला आहे.
या सामन्यात (IND vs ENG) रोहितने (Rohit Sharma) सलामीला फलंदाजीला येत १४ चेंडूत केवळ २४ धावा केल्या. ५ चौकारांच्या मदतीने त्याने ही छोटेखानी खेळी केली. मोईन अलीने जोस बटलरच्या हातून त्याला स्वस्तात बाद केले. मात्र या छोट्या खेळीसह त्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार विराटचा (Virat Kohli) विक्रम मोडला आहे.
रोहित टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने १००० धावा करणारा (Quickest Indian Captain To Reach 1000 T20I Runs) भारतीय कर्णधार बनला आहे. त्याने केवळ २९ डावांमध्ये या विक्रमाला गवसणी घातली आहे. यापूर्वी हा विक्रम विराटच्या नावावर होता, ज्याला १००० टी२० धावा पूर्ण करण्यासाठी ३० डाव खेळावे लागले होते. असे असले तरीही, रोहित पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा विक्रम मोडू शकला नाही. कर्णधार आझमने (Babar Azam) फक्त २६ डावांमध्ये आपल्या टी२० क्रिकेटमधील १००० धावा पूर्ण केल्या आहेत. तो या यादीत अव्वलस्थानी विराजमान आहे.