भारतीय क्रिकेट संघाचा आशिया चषक 2022 मधील प्रवास जवळपास संपला आहे. भारतीय संघाने त्यांचे सुपर-4 फेरीतील सलग दोन सामने गमावले आहेत, ज्यामुळे त्यांचा अंतिम सामन्यात पोहोचण्याचा मार्ग अवघड बनला आहे. या अपयशी कामगिरीनंतर भारताच्या संघनिवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र, आता विश्वचषकासाठी जाणाऱ्या भारतीय संघाबाबत स्वतः कर्णधार रोहित शर्माने एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
आशिया चषकामधील पराभवानंतर भारतीय संघावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. टी20 विश्वचषकासाठी संघ अद्याप तयार नाही, असे अनेक समीक्षकांचे मत आहे. याबाबत कर्णधार रोहित शर्माला प्रश्न विचारला असता तो म्हणाला,
“टी20 विश्वचषक संघ जाहीर होण्यापूर्वी आम्ही ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत आणखी खेळाडूंना आजमावू. सध्याचा 95 टक्के संघच विश्वचषकात खेळेल. या संघात काहीच बदल होणार आहेत.”
सध्या आशिया चषकात खेळणाऱ्या भारतीय संघातील बरेच चेहरे विश्वचषकात खेळताना दिसतील. आशिया चषकात दुखापतग्रस्त झालेला रवींद्र जडेजा हा मात्र विश्वचषकात खेळण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल हे पुनरागमन करतील. फिरकी गोलंदाजीत रवी बिश्नोई की रविचंद्रन अश्विन हा पेच निवडसमितीसमोर असणार आहे.
श्रीलंका विरुद्ध भारत या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 173 धावा धावफलकावर लावल्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने एकाकी झुंज दिली. 41 चेंडू खेळताना त्याने 72 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 षटकार आणि 5 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव 34 धावा करू शकला. प्रत्युत्तरात सलामीवीर पथुम निसंका (52 धावा) आणि कुसल मेंडिस (57 धावा) यांच्या खेळींच्या जोरावर श्रीलंकेने 1 चेंडू शिल्लक असताना 6 गडी राखून सामना जिंकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दीपक हुड्डाकडून गोलंदाजी का करून घेतली नाही?, कर्णधार रोहितने सांगितले कारण
भारतातील ‘या’ मैदानातील स्टँडला दिले भज्जी अन् युवीचं नाव! वाचा सविस्तर
नजरों से नजर मिली.. पंत नव्हे ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरसोबत उर्वशीचा भिडलाय टाका? तुम्हीही पाहा