सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज (INDvWI) विरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळत आहे. अहमदाबाद येथे झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने निर्भेळ यश मिळवत ३-० असा मालिका विजय साजरा केला. त्यानंतर आता उभय संघांमध्ये कोलकाता येथील ईडन गार्डन्समध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाईल. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने संघाचा अनुभवी अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्याबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. (Rohit Sharma On Hardik Pandya)
टी२० मालिकेपूर्वी रोहित शर्मा याला हार्दिक पंड्याविषयी विचारले गेले. त्यावर बोलताना रोहित म्हणाला,
“हार्दिक हा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात योगदान देतो. पंड्या फलंदाज म्हणून खेळू शकतो की नाही यावर संघ व्यवस्थापनात कोणतीही चर्चा झालेली नाही. परंतु प्रत्येक खेळाडूने पूर्णपणे तंदुरुस्त असावे, जेणेकरून आम्ही आणखी एक पाऊल टाकू शकू. प्रतिस्पर्ध्यानुसार खेळाडूंची निवड केली जाईल. संघाचे दार सर्वांसाठी खुले आहे.”
हार्दिक २०२१ टी२० विश्वचषकानंतर कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेला नाही. दुखापतीमुळे त्याने हा निर्णय घेतला होता. आता तो आगामी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करताना दिसून येईल.
रोहित पुढे बोलताना म्हणाला,
“तुम्ही विश्वचषकासाठी झटपट निर्णय घेऊ शकत नाही. विश्वचषकासाठी योग्य टीम कॉम्बिनेशन शोधावे लागेल. ऑस्ट्रेलियातील प्रत्येक मैदानाची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे टीम कॉम्बिनेशन प्रत्येकाला अनुसरून पाहावे लागणार आहे. आमच्याकडे किती फिरकी आणि वेगवान अष्टपैलू खेळाडू आहेत, जे खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन चांगली फलंदाजी करू शकतात हे पाहावे लागेल. गोलंदाजांचेही तसेच आहे, परिस्थितीनुसार त्यांचा वापर केला जाईल. सर्व खेळाडूंना त्यांची भूमिका सांगितलेली आहे. आता त्यांना आपले सर्वोत्तम प्रदर्शन करून दाखवावे लागेल.” यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक खेळला जाईल. ऑस्ट्रेलिया स्पर्धेचा यजमान तसेच गतविजेता आहे.
महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात वफादारी! ‘या’ ५ खेळाडूंनी कधीच दिला नाही संघमालकांच्या विश्वासाला तडा (mahasports.in)





