मंगळवारी(१० नोव्हेंबर) मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला ५ विकेट्सने पराभूत करत विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवले. हा अंतिम सामना मुंबईला जिंकून देण्यात कर्णधार रोहित शर्माचे ६८ धावांचे योगदान महत्त्वाचे ठरले. कर्णधाराला साजेशी खेळी करुन संघाला जिंकवल्यानंतर ड्रेसिंगरुममध्ये रोहितने प्रेरणादायी भाषण केले.
रोहितच्या भाषणाचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये रोहित म्हणत आहे की ‘आपल्या सर्वांचे अभिनंदन. ऑगस्टमध्ये सुरु झालेला हा हंगाम आपल्यासाठी चांगला होता. हा हंगाम सुरु होण्याआधीच आपण तयारीला सुरुवात केली होती. मला आठवतं आपण जूनमध्ये कठीण काळात या हंगामासाठी तयारी सुरु केली होती.’
तसेच आयपीएलचा हा हंगाम कोराना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर युएईमध्ये झाल्याबद्दल रोहित म्हणाला, ‘हे सर्व सोपे असणार नव्हते, हे आपल्याला माहित होते. आपण जेव्हा इथे (युएईमध्ये) आलो तेव्हा आपल्यासाठी सर्व वातावरण नवीन होते. हॉटेलच्या बाहेर जाऊ शकत नव्हतो. बाहेरच्या गोष्टी अनुभवू शकत नव्हतो. पण आपला संघ शिस्तप्रिय होता आणि ती शिस्त मैदानातही दिसली. त्याचमुळे आपल्याला आज ती ट्रॉफी मिळाली आहे.’
या आयपीएल हंगामादरम्यान सर्व संघांचे खेळाडू, सपोर्ट स्टाफ, कुटुंबिय, अधिकारी जैव सुरक्षित वातावरणामध्ये होते. त्यांना हे वातावरण सोडून बाहेर जाण्याची परवानगी नव्हती.
याबरोबरच सर्वांचे आभार मानताना रोहित म्हणाला, ‘अनेक जणांचे आभार मानायचे आहेत, माहेला जयवर्धने, शेन बॉन्ड, रॉबिन सिंग, झहिर खान जो आत्ता इथे नाहीये. त्याची आज नक्कीच कमी भासत आहे. सपोर्ट स्टाफ, मेडिकल टीमचेही आभार. आपल्यासाठी हा कठीण काळ होता. मी दुखापतग्रस्त झालो होतो. पण त्यांचा विश्वास होता, म्हणून मी पुन्हा मैदानात दिसू शकलो. त्यामुळे सर्वांचे खूप आभार.’
रोहित पुढे म्हणाला ‘शेवटी त्या खेळाडूंनाही धन्यवाद, ज्यांना सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यांना खेळायची संधी मिळाली नसली, तरी त्यांचा पाठिंबा, त्यांची उर्जा हंगामाच्या सुरुवातीपासून मिळत होती. अखेर इथे असलेल्या कुटुंबीयांचेही आभार. आपण सर्वजण एक कुंटुंबच आहोत.’
https://twitter.com/mipaltan/status/1326728928329920513
यंदाच्या हंगामातील मुंबई इंडियन्सचा प्रवास शानदार राहिला आहे. त्यांनी साखळी फेरीतील १४ पैकी ९ सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला होता. त्यानंतर त्यांनी क्वालिफायर आणि अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवले. मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे, ज्यांना आयपीएलचे पाचवे विजेतेपद मिळवता आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाला सापडला नवा पॉटींग, भारताविरुद्ध कसोटी मालिकेत करणार पदार्पण
भारीच ना! आयपीएल २०२१मध्ये असणार ‘इतके’ संघ, तब्बल ७६ सामन्यांची प्रेक्षकांना मेजवानी?
विरेंद्र सेहवागने तयार केला सर्वोत्तम आयपीएल संघ, विराट कोहली कर्णधार तर रोहित शर्मा…
ट्रेंडिंग लेख –
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
आयपीएल २०२०मधील ५ खेळाडू; ज्यांनी सिंहाचा वाटा उचलत गाजवले मैदान
रामराम आणि पुन्हा भेटू! आयपीएल २०२० ला अलविदा करत असताना एक नजर या स्पर्धेतील महत्वाच्या घटनांवर






