आगामी टी-२० विश्वचषकानंतर रोहित शर्मा टी-२० क्रिकेटमध्ये सध्याचा कर्णधार विराट कोहलीची जागा घेऊ शकतो. याबद्दलच्या चर्चेची सुरुवात आधीच सुरू झाली होती. पण नुकतेच विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्याच्या घोषणेनंतर या चर्चा आणखी वाढल्या आहेत. भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर टी-२० चे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. रोहित शर्माला त्याच्या जागी या प्रकारामध्ये भारतीय संघाचा कर्णधार बनवले जाईल, अशी चाहत्यांना आशा आहे. साधारणपणे असे दिसून येते की, प्रत्येक कर्णधाराच्या आगमनाने संघात मोठे बदल होत असतात. भारतीय संघात असे ३ खेळाडू आहेत, जे रोहित शर्मा टी२०चा कर्णधार बनताच भारतीय संघामध्ये आपले स्थान निश्चित करू शकतात.
इशान किशन
इशान किशन उत्कृष्ट यष्टीरक्षणासह स्फोटक फलंदाजी करण्यातही तज्ञ आहे. यावर्षी आयसीसी टी-२० विश्वचषकासाठीही त्याची निवड झाली आहे. इशान किशन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत इशानची कामगिरी बरीच प्रभावी झाली होती.
भारतीय निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान दिले. मात्र, भारतीय संघात आणखी एक यष्टीरक्षक रिषभ पंतच्या रूपात आहे. अशा परिस्थितीत जर रिषभची कामगिरी खराब झाली; तर त्याच्याजागी रोहित शर्मा इशान किशनला संधी देऊ शकतो.
ईशान किशन, आतापर्यंत एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांमध्ये खेळला आहे. तो या विश्वचषकात आपले सर्वोत्तम देण्यास सज्ज झाला आहे. इशान किशनने पदार्पणातच एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावले होते.
सूर्यकुमार यादव
सूर्यकुमार यादवने ज्या वेगाने भारतीय क्रिकेट संघात आपले स्थान पक्के केले ते खूप अतुलनीय आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी त्याला बराच काळ थांबावे लागले असले तरीही, प्रत्येक संधीचे सोने करत त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळे निवडकर्त्यांनीही त्याच्यावर विश्वास ठेवला आहे.
सूर्यकुमार यादवने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत केवळ ४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने या सामन्यांमध्ये त्याच्या खेळीने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. म्हणून तो २०२१ च्या टी२० विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करतांना दिसणार आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा निश्चितपणे प्लेइंग इलेव्हनमध्ये या प्रतिभाशाली खेळाडूचा समावेश करेल.
सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा दोघेही बऱ्याच वर्षांपासून मुंबई इंडियन्ससाठी एकत्र खेळत आहेत. रोहित शर्माने सूर्यकुमार यादवची जागा निश्चित केल्यास भारताची फलंदाजी खूप मजबूत दिसेल.
युझवेंद्र चहल
युझवेंद्र चहल भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये एक उत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे. तो गेल्या दोन वर्षांमध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वोत्तम फिरकीपटू राहिला आहे. मात्र, लेगस्पिनर युझवेंद्र चहलला संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२१ साठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. पण प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहित आहे की, तो किती चांगला गोलंदाज आहे आणि तो लवकरच संघात पुनरागमन करत महत्वाच्या फिरकीपटूची भूमिका बजावताना दिसेल. याच कारणामुळे, रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर तो निश्चितपणे युझवेंद्र चहलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करेल.
गेल्या दोन ते तीन वर्षांत राशीद खाननंतर तो सर्वोत्तम टी२० फिरकीपटू ठरला आहे. त्याच्या बोटांची जादू कुणापासून लपलेली नाही आणि त्याची गोलंदाजी हे फलंदाजांसाठी शस्त्राप्रमाणे आहे, ज्याचा रोहित शर्मा नक्कीच वापर करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटने टी२०चे नेतृत्त्वपद सोडणे टीम इंडियाच्या येणार अंगाशी, ‘या’ गोष्टींमध्ये होऊन बसणार अवघड
विराटसारखा टी२० कर्णधार शोधून सापडणार नाही, ‘हे’ ५ अद्भुत विक्रम केले आहेत नावावर
आरसीबीच्या फलंदाजांच्या पहिल्या टप्प्यातील ३ ‘ब्लॉकब्लास्टर खेळी’, पडीक्कलचे नाबाद शतकही आहे यादीत