भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान बुधवारपासून (1 मार्च) बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 मधील तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारतीय संघ प्रयत्न करेल. इंदोर येथील मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने या मालिकेसोबतच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याकडे देखील आपले लक्ष असल्याचे कबूल केले.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाने एकतर्फी विजय साजरे केले. नागपूर व दिल्ली येथे झालेले हे सामने भारतीय संघाने तीन दिवसात जिंकले. त्यामुळे इंदोर येथील सामन्यात देखील भारतीय संघाचे पारडे जड आहे. भारतीय संघाने हा सामना जिंकल्यास मालिकेतील अखेरचा सामना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीचा सराव म्हणून असेल, असे कर्णधार रोहित शर्मा याने म्हटले.
रोहित म्हणाला,
“इंदोर कसोटीचा निकाल आमच्या बाजूने लागल्यास आम्ही अहमदाबादमध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची तयारी करू. तिथे वेगवान गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी असावी अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे खेळाडूंना चांगला सराव मिळेल. याबाबत संघ व्यवस्थापनासोबत चर्चाही झालीये.”
भारतीय संघाने 2018 दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी अशीच तयारी केली होती. त्यावेळी भारताने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील कोलकता येथील कसोटी वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर खेळलेली.
इंदोर कसोटी जिंकल्यास भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी सलग दुसऱ्यांदा पात्र ठरेल. स्पर्धेचा अंतिम सामना 6 जूनपासून ओव्हल येथे खेळला जाईल. भारतीय संघाला या स्पर्धेच्या पहिल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने पराभूत करत विजेतेपद पटकावले होते.
(Rohit Sharma Want Green Top Wicket In Ahmedabad Ahead WTC Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंदोर कसोटीत विराट करणार खास क्लबमध्ये एन्ट्री! यापूर्वी भारताकडून फक्त द्रविडच मानकरी
इंदोर नव्हेतर थेट अहमदाबाद कसोटीचा प्लॅन करतोय रोहित! WTC फायनलबाबत म्हणाला, “तयारी आता…”