अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला आहे. यासह मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील अंतिम सामना बुधवारी (११ फेब्रुवारी ) पार पडणार आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) दिग्गज भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर (sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांचा विक्रम तोडण्याची सुवर्णसंधी आहे.
रोहित शर्मा हा भारतीय संघातील सर्वोत्कृष्ट सलामीवीर फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तसेच वेस्ट इंडिज संघाविरुद्ध देखील त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. वनडेत डावाची सुरुवात करताना त्याने वेस्ट इंडिज संघाविरुद्ध एकूण १०११ धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेच सलामीला फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर सर्वोच्च स्थानी आहे. सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिज संघाविरुद्ध एकूण १०२४ धावा केल्या आहेत. तर सौरव गांगुली १०१५ धावांसह या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
वेस्ट इंडीज संघाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात जर रोहित शर्माने ५ धावा केल्या, तर तो सौरव गांगुलीला मागे टाकू शकतो. तसेच १४ धावा करताच तो सचिन तेंडुलकरला ही मागे टाकू शकतो. अशी कामगिरी करत तो वेस्ट संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय सलामीवीर फलंदाज ठरू शकतो.
वेस्ट इंडीज संघाविरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय सलामीवीर फलंदाज :
१०२४ धावा – सचिन तेंडुलकर
१०१५ धावा – सौरव गांगुली
१०११ धावा – रोहित शर्मा*
रोहित शर्माने आतापर्यंत वेस्ट इंडिज संघाविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. त्याने वेस्ट इंडिज संघाविरुद्ध एकूण ३५ वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ५८.८१ च्या सरासरीने १५८८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ३ शतक आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच १६२ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
महत्वाच्या बातम्या :
विश्वचषकासाठी भारताच्या ‘या’ सलामीवीराला करा तयार, माजी फिरकीपटूचा कामाचा सल्ला
‘मराठमोळा’ ऋतुराज पुनरागमनासाठी सज्ज, कोरोनावर केली मात; पण तिसऱ्या वनडेत मिळणार का संधी?
जमशेदपूर एफसीचा दणदणीत विजय, केरला ब्लास्टर्सला नमवून दुसऱ्या क्रमांकावर झेप!