भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने नुकताच आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला (Virat Kohli Resign As Test Captain). त्याच्या तडकाफडकी राजीनामा देण्याने संघाचे कर्णधारपद रिक्त झाले आहे. त्याच्या जागी आता कोणाची वर्णी लागणार याची सर्वांना उत्सुकता लागलीये. सध्या या शर्यतीत आघाडीवर उपकर्णधार रोहित शर्मा असून, दुसऱ्या क्रमांकावर नुकतेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जोहान्सबर्ग कसोटी संघाचे नेतृत्व केलेला केएल राहुल आहे. (Rohit Sharma & KL Rahul Front Runner For Test Captaincy)
रोहित शर्माला कर्णधार केल्यास तो केवळ एक कामचलावू कर्णधार म्हणून ओळखला जाऊ शकतो. कारण, रोहितचे वय व तंदुरुस्ती ही त्याच्या विरोधात जात आहे. रोहित सध्या ३४ वर्षांचा असून, तो सातत्याने दुखापतग्रस्त असतो. या गोष्टींचा विचार केल्यास केएल राहुल याला अनेक माजी खेळाडू कर्णधारपदासाठी योग्य दावेदार समजत आहेत. राहुल २९ वर्षांचा असल्याने तो मोठ्या काळासाठी संघाचा कर्णधार बनू शकतो. त्यामुळे, ३४ वर्षाचा रोहित की तिशीतील राहुल हे दोन पर्याय बीसीसीआय समोर आहेत. तसेच भारताचे माजी दिग्गज सलामीवीर सुनील गावसकर व सुरेश रैना यांनी रिषभ पंत हा कर्णधार म्हणून योग्य असेल असे म्हटले आहे.
भारताला लाभले केवळ दोन ३० पेक्षा जास्त वय असलेले कर्णधार
नजिकच्या काळाचा (१९९० पासून) विचार केल्यास भारतीय क्रिकेटमध्ये ७ खेळाडूंनी पूर्ण काळ कसोटी कर्णधार म्हणून जबाबदारी निभावली. यातील केवळ दोनच कर्णधार हे तिशी ओलांडले होते. मोहम्मद अजहरुद्दिन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, एमएस धोनी व विराट कोहली यांना तिशीच्या आत नेतृत्व सोपविले गेले होते. तर, राहुल द्रविड व अनिल कुंबळे यांनी तिशी पार केल्यानंतर संघाचे कर्णधारपद भूषविले. आज आपण पाहूया यापैकी कोणत्या खेळाडूने कोणत्या वर्षी संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती.
१) मोहम्मद अजहरुद्दिन (Mohammad Azharuddin) २६ वर्ष ११ महिने २५ दिवस
मोहम्मद अजहरुद्दिन यांना कर्णधार बनवले गेले तेव्हा त्यांचे वय २६ वर्ष ११ महिने २५ दिवस इतके होते. त्यांनी न्यूझीलंड विरुद्ध क्राइस्टचर्च २ फेब्रुवारी १९९० मध्ये प्रथम नेतृत्वाची जबाबदारी सांभाळलेली. त्यांनी ४७ कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले
२) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) २३ वर्ष ५ महिने १६ दिवस
हा दिग्गज फलंदाज जेव्हा कर्णधार झाला तेव्हा त्याचे वय २३ वर्षे होते. सचिनने १० ऑक्टोबर १९९६ रोजी दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच कर्णधारपद भूषवले. त्याने २५ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले.
३) सौरव गांगुली (Sourav Ganguly) २८ वर्ष ५ महिने १६ दिवस
सौरव गांगुलीने १० नोव्हेंबर २००० रोजी ढाका येथे बांगलादेशविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच भारताचे नेतृत्व केले. तेव्हा तो २८ वर्षांचा होता. २००५ पर्यंत त्याने ४९ कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. कसोटीतील कर्णधार म्हणून त्याचा शेवटचा सामना २० सप्टेंबर २००५ पासून हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध होता.
४) राहुल द्रविड (Rahul Dravid) ३१ वर्ष ११ महिने ३० दिवस
भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी २००३ मध्ये प्रथम कसोटीत कर्णधारपद भूषवले होते. परंतु, डिसेंबर २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पूर्णवेळ कर्णधार म्हणून त्याची वर्णी लागली. त्यावेळी द्रविड जवळपास ३२ वर्षांचा होता. २००७ पर्यंत तो संघाचा कर्णधार होता.
५) अनिल कुंबळे (Anil Kumble) ३६ वर्ष ३ महिने ५ दिवस
भारताच्या या दिग्गज लेगस्पिनरला २००७ मध्ये द्रविडनंतर भारतीय संघाची कमान मिळाली होती. त्यावेळी धोनी मर्यादित षटकांमध्ये संघाचा कर्णधार झाला होता. बीसीसीआयला कुंबळेच्या नेतृत्वाखाली धोनीला तयार करायचे होते. त्यामुळे कुंबळेला पूर्णवेळ कर्णधार करण्यात आले. निवृत्तीपर्यंत तो संघाचा कर्णधार राहिला. २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिल्ली कसोटीनंतर त्याने निवृत्ती घेतली. कुंबळेने कर्णधार म्हणून पहिला सामना २२ नोव्हेंबर २००७ रोजी दिल्लीत पाकिस्तानविरुद्ध खेळला. जेव्हा तो कर्णधार झाला तेव्हा तो ३६ वर्षे तीन महिने पाच दिवसांचा होता.
६) एमएस धोनी (MS Dhoni) २६ वर्ष ५ महिने ३० दिवस
कुंबळेच्या निवृत्तीनंतर धोनीला कसोटीत कर्णधारपद मिळाले. २००८ ते २०१४ पर्यंत तो संघाचा कर्णधार होता. ६ नोव्हेंबर २००८ रोजी नागपुरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीत त्याने प्रथमच भारताचे नेतृत्व केले. सौरव गांगुलीच्या कारकिर्दीतील तो शेवटचा सामना होता. धोनी कर्णधार झाला तेव्हा २६ वर्षांचा होता.
७) विराट कोहली (Virat Kohli) २६ वर्ष १ महिना ४ दिवस
धोनीनंतर कोहली भारताचा कर्णधार झाला. त्याने ९ डिसेंबर २०१४ रोजी कसोटी कर्णधारपद स्वीकारले. त्यावेळी तो २६ वर्षांचा होता. कोहलीने भारतासाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक ६८ कसोटी सामने खेळले. यामध्ये भारताने ४० जिंकले. तर, केवळ १७ सामने हरले. ११ सामने अनिर्णित राहिले.
महत्त्वाच्या बातम्या-
खुद्द रोहितच कसोटी कर्णधारपदी आपली वर्णी लावण्यात बनतोय अडथळा, पण कसं? वाचा सविस्तर (mahasports.in)