---Advertisement---

World Cup 2023 । कर्णधारांच्या कार्यक्रमात रोहितचे मजेशीर उत्तर, बाबर आझमची प्रतिक्रियाही चर्चेत

Rohit Sharma
---Advertisement---

वनडे विश्वचषक गुरुवारी (5 ऑक्टोबर) अहमदाबादमध्ये सुरू होणार आहे. त्याआधी बुधवारी (4 ऑक्टोबर) अहमदाबादमध्येच विश्वचषकात सहभागी होणाऱ्या सर्व कर्णधारांना एकत्र बोलावले गेले. या कार्यक्रमात सर्व कर्णधारांसोबत चर्चा केली गेली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासह इतर सर्व कर्णधारांनी यावेळी प्रतिक्रिया दिल्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याची प्रतिक्रिया देखील चर्चेत आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) मागच्या विश्वचषकात (2019) भारताचा उपकर्णधार होता आणि विराट कोहली संघाचे नेतृत्व करत होता. यावर्षीच्या विश्वचषकात मात्र विराट संघाचा कर्णधार नाहीये. रोहित शर्मा याच्याकडे विश्वचषक संघाचे नेतृत्व सोपवले गेले आहे. या जबाबदारीसाठी रोहितने कृतज्ञता व्यक्त केली. “विश्वचषकात कर्णधारपद मिळाल्यामुळे मी कृतज्ञ आहे. आम्ही या संघात सर्वोत्तम प्रदर्शन करू आणि स्पर्धेचा आनंद घेऊन.” मागच्या वेळीचा विश्वचषक इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता. याच पार्श्वभूमीवर मागच्या वेळी विश्वचषकाचे विजेतेपद दोन्ही संघांमध्ये (इंग्लंड आणि न्यूझीलंड) विभागून दिले पाहिजे होते का? असा प्रश्न रोहितला विचारला गेला. यावर कर्णदाराने मजेशीर अंदाजत उत्तर दिले की, “अरे यार, विजेता संघ घोषित करणे माझे काम नाहीये.”

यावेळी पाकिस्तानच्या कर्णधार बाबर आझम याची प्रतिक्रिया देखील खास राहिली. भारतात येणाऱ्या सर्व संघांसाठी बीसीसीआयने खास सोय केली आहे. पाकिस्तान संघाचे देखील हैदराबादमध्ये शाही स्वागत केले गेले. भारतात होणारा पाहुणचार पाहून पाकिस्तान संघ हैराण असल्याचे बाबरच्या वक्तव्यावरून समजते. बाबर म्हणाला की, “आमचा पाहुणचार अप्रतिम पद्धतीने होत आहे. आम्हाला खरोखर एवढ्या चांगल्या स्वागताची अपेक्षा नव्हती. केवळ घरी असताना असे होते.”

दरम्यान, वनडे विश्वचषकाचा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. गुरुवारी दुपारी 2 वाजता हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना सुरू होईल. यजमान भारतीय संघाला विश्वचषकातील आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध खेळायचा आहे. (Rohit Sharma’s funny statement at the captain’s program before the World Cup 2023)

महत्वाच्या बातम्या – 
‘भारत फायनलमध्ये हरणार, पाकिस्तानसाठी सेमीफायनलही कठीण’, वाचा अँडरसन अजून काय म्हणाला
…आणि भारत 28 वर्षांनंतर जगज्जेता बनला, कोट्यवधी मने जिंकणारा धोनीचा सिक्स अन् शास्त्रींची कॉमेंट्री अजरामर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---