पुणे। मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाला तर, मुलींच्या गटात जम्मू काश्मीर संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना नेहरु स्टेडियम,गुवाहाटी येथे सुरू असलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय रोलबॉल फेडरेशन करंडक स्पर्धेच विजेतेपद पटकावले.
मुलांच्या गटाच्या अंतिम लढतीत महाराष्ट्र संघाने आसाम संघाला १०-१ असे पराभूत करून विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र संघाकडून आदित्य गनेशवाडे, मिहीर साने व सौरभ भालेराव यांनी प्रत्येकी 2 तर, योगेश तायडे, अजिंक्य जमदाडे, भार्गव घारपुरे यांनी प्रत्येकी १ गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचला. एकतर्फी झालेल्या लढतीत आसाम संघाकडून दीपज्योती याने १ गोल करताना लढत देण्याचा प्रयत्न केला.
मुलींच्या गटात अतितटीच्या लढतीत जम्मू काश्मीर संघाने आसाम संघाला २-१ असे पराभूत केले. जम्मू काश्मीर संघाच्या अंकिता चोप्रा व सिमरन रैना यांनी प्रत्येकी १ गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. आसाम संघाकडून मनीषा प्रधान हिने १ गोल करताना संघासाठी दिलेली लढत अपुरी ठरली.
तत्पूर्वी, मुलांच्या गटाच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाने जम्मू काश्मीर संघाला ६-५ असे पराभूत केले. महाराष्ट्र संघाकडून संजोग तापकीर २, आदित्य गणेशवडे २ तर मिहीर साने आणि योगेश तायडे यांनी प्रत्येकी एक गोल करून आपल्या संघाला विजयापर्यंत पोहचवले. अटीतटीच झालेल्या या सामन्यात जम्मू काश्मीर संघाकडून रक्षक जनदैल ४,अमरितपाल सिंग १, गोल केला पण त्यांची हि जुंझ विजयासाठी कमी पडली.
उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत आसाम संघाने उत्तर प्रदेश संघाला ७-४ असे पराभूत केले. आसाम कडून बी.ए कारगिलने ५ तर मनदीप मान, संजीब कुमार यांनी प्रत्येकी १ गोल केला . उत्तर प्रदेश कडून सचिन सैनी २, गोविंद गौर आणि त्रिभुवन याने प्रत्येकी १ गोल केला.
मुलींच्या गटाच्या उपांत्य फेरीत जम्मू काश्मीर संघाने राजस्थान संघावर १-० अशा फरकाने मात केली. जम्मू काश्मीर संघाकडून कव्नीत कौर १ गोल करून आपल्या संघला विजयी केले तर राजस्थान संघला भोपळा हि फोडता आला नाही.
दुसऱ्या उपांत्य लढतीमध्ये सामन्यात आसाम संघाने महाराष्ट्र संघला २-१ असे पराभूत केले. आसाम संघाच्या मनीषा प्रधानने २ गोल केले व संघचा विजयाचा मार्ग सुकर केला. महाराष्ट्र संघाकडून कर्णधार मानसी मारणे १ गोल केला, परंतु तिने दिलेली लढत महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत पोचविण्यास अपयशी ठरली.