क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. कारण, या खेळात शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल सांगता येत नाही. मात्र, जर संघ सातत्यानेच अपयशाचा सामना करत असेल, तर चाहत्यांसोबतच संघ व्यवस्थापनही चिंतेत पडते. यामुळे संघाच्या कर्णधाराची उचलबांगडीदेखील केली जाते. काही कर्णधार असेही असतात, जे संघाला सतत अपयश मिळत असल्यामुळे स्वत:च कर्णधारपद सोडून देतात. यामध्ये वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू निकोलस पूरन याचाही समावेश आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाने खूपच निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. संघाच्या खराब कामगिरीनंतर वेस्ट इंडिज संघामध्ये बदल होत आहेत. पराभवाची संपूर्ण जबाबदारी घेत संघाचा कर्णधार निकोलस पूरन (Nicholas Pooran) याने सोमवारी (दि. 21 नोव्हेंबर) कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच, त्याच्या राजीनाम्यानंतर आता वेस्ट इंडिज संघ अष्टपैलू रोवमन पॉवेल (Rovman Powell) याला कर्णधार बनवण्याच्या तयारीत आहे.
कोण आहे वेस्ट इंडिजचा होणारा पुढील कर्णधार रोवमन पॉवेल?
रोवमन पॉवेल वेस्ट इंडिज संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने संघासाठी 45 वनडे सामने, 55 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात त्याने 880 धावा चोपल्या आहेत. तसेच, गोलंदाजी करताना 4 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच, वनडेत त्याने 897 धावा केल्या आहेत आणि 2 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याच्या आयपीएल कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग राहिला आहे. तो मोठमोठे षटकार मारण्यासाठीही ओळखला जातो. तसेच, तो कधीही सामना पालटण्याची क्षमता बाळगतो.
‘आम्ही खराब प्रदर्शन केले’
खरं तर, निकोलस पूरनने कर्णधारपद सोडण्याची घोषणा करत म्हटले होते की, “टी20 विश्वचषकातील निराशेनंतर मी नेतृत्वाबद्दल खूप विचार केला आहे. विश्वचषकात आम्ही खराब कामगिरी केली आहे. मी आताही वेस्ट इंडिज क्रिकेटच्या नेतृत्वाकडे एक सन्मान म्हणून पाहतो. यामध्ये काहीच शंका नाही की, मी वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे आणि मी एक वरिष्ठ खेळाडू म्हणून माझी सेवा देण्यास उत्सुक आहे.”
अशात रोवमन पॉवेल वेस्ट इंडिजचा कर्णधार बनतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (rovman powell expected to be next captain of west indies cricket team after nicholas pooran resignation)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्याची बॅटिंग पाहून मी लगेच फिंचला मेसेज केला आणि म्हटलं…’, सूर्याच्या शतकावर मॅक्सवेलची प्रतिक्रिया
भारत- बांगलादेशमधील तिसऱ्या वनडेच्या दिवशीच आंदोलन, यजमानांच्या बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय