आयपीएल २०२१ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेत सोमवारी (११ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये एलिमिनेटरचा सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, शेवटच्या षटकात कोलकाता नाईट रायडर्स संघाने बाजी मारत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ४ गडी राखून पराभूत केले. या पराभवासह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या नावे आगळ्या वेगळ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आयपीएल २०२१ स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ होता. या संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यामुळे या संघाला जेतेपद मिळवण्यासाठी देखील प्रबळ दावेदार मानले जात होते. पण, कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजय मिळवत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे हे स्वप्न धुळीस मिळवले आहे.
यासह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ सलग दुसऱ्या वर्षी एलिमिनेटरच्या सामन्यात पराभूत होत स्पर्धेबाहेर झाला. त्यामुळे सगल दोन हंगामात एलिमिनेटर सामन्यात पराभूत होणारा बेंगलोर पहिलाच संघ ठरला आहे. गतवर्षी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या एलिमिनेटरच्या सामन्यात देखील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता.
सोमवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून कर्णधार विराट कोहलीने ३३ चेंडूंमध्ये सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने ५ चौकार मारले होते. तर देवदत्त पडिक्कलने १८ चेंडूंमध्ये २१ धावांची खेळी केली होती. परंतु इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला २० षटक अखेर अवघ्या १३८ धावा करण्यात यश आले.
या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून शूबमन गिलने १८ चेंडूंमध्ये सर्वाधिक २९ धावांची खेळी केली. तर व्यंकटेश अय्यरने आणि सुनील नरेनने प्रत्येकी २६ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ४ गडी राखून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
केएल राहुल पंजाब किंग्ज संघाला ठोकणार रामराम? चर्चेला उधाण
‘बिग बेन इज बॅक’! पुन्हा क्रिकेटचे मैदान गाजवायला सज्ज झाला स्टोक्स