रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात गुरुवारी (१९ मे) आयपीएल २०२२चा ६७ वा सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात बेंगलोर संघाने १८.४ षटकात गुजरातचे आव्हान गाठले आणि ८ विकेट्स राखून सामना खिशात घातला. या सामन्यानंतर प्लेऑफचे चित्र स्पष्ट झाले आहे.
बेंगलोरने गुजरातला (RCB vs GT) पराभूत करत आणखीन २ गुण खात्यात जोडले आहेत. बेंगलोरचा हा १४ सामन्यांपैकी आठवा विजय होता. या विजयासह त्यांच्या खात्यात १६ गुण जमा झाले असून त्यांनी गुणांबाबतीत राजस्थान रॉयल्सची बरोबरी केली आहे. मात्र बेंगलोर संघाचा नेट रन रेट (-०.२५३) कमी असल्याकारणाने त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. हा सामना जिंकत बेंगलोरने प्लेऑफमधील त्यांचे आव्हान कायम राखले (RCB Playoff Equations) आहे.
बेंगलोरच्या विजयानंतर पंजाब किंग्ज व सनरायझर्स हैदराबाद प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. सध्या त्यांच्या खात्यात १२ गुण जमा असून उभय संघांनी त्यांचा शिल्लक असलेला एक सामना जिंकला तरीही त्यांचे एकूण १४ गुणच होतील. हे गुण त्यांना पहिल्या चार संघांमध्ये जागा बनवण्यास पुरेसे नसतील.
अशाप्रकारे बेंगलोरने त्यांच्या प्लेऑफच्या शर्यतीतील २ प्रतिस्पर्धींना बाहेर नक्कीच केले आहे. परंतु आताही बेंगलोर संघाचे स्थान अधांतरीच आहे. कारण दिल्ली कॅपिटल्स संघ चौथ्या स्थानासाठी बेंगलोरला बरोबरीची टक्कर देऊ शकतो. दिल्ली संघाच्या खात्यातही सध्या १४ गुण आहेत. तसेच त्यांचा नेट रन रेटही (+०.२५५) बेंगलोरपेक्षा चांगला आहे. अशात जर दिल्लीने मुंबई इंडियन्सविरुद्धचा त्यांचा शेवटचा साखळी फेरी सामना जिंकला, तर बेंगलोर प्लेऑफमधून बाहेर पडेल आणि दिल्ली प्लेऑफसाठी पात्र ठरणारा चौथा संघ बनेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आता फक्त मोजायचं! ‘करा अथवा मरा’ सामन्यात विराट कोहलीची फिफ्टी, रचले विक्रमांचे मनोरे
GTvsRCB | विराट-मॅक्सवेलचा झंझावात, ८ विकेट्सने मॅच जिंकत आरसीबीने कायम राखले प्लेऑफमधील आव्हान