शनिवारी (०२ एप्रिल) मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर आयपीएल २०२२ चा नववा सामना झाला. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेली ही लढत अतिशय चित्तथरारक राहिली. नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजी निवडल्यामुळे राजस्थानचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. राजस्थानने निर्धारित २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर १९३ धावा फलकावर लावल्या. राजस्थानकडून सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर याने शानदार शतक झळकावले. यासह त्याने बरेच विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
राजस्थानकडून इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज बटलर (Jos Buttler) आणि युवा भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वाल सलामीला फलंदाजीसाठी आले होते. मात्र मुंबईच्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याला केवळ एका धावेवर पव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र बटलरने एक बाजू धरून ठेवली आणि मुंबईच्या भेदक माऱ्याचा सामना करताना १०० धावा (Jos Buttler Century) केल्या. या खेळीदरम्यान त्याने ६८ चेंडू खेळले आणि ५ षटकार व ११ चौकारही मारले. यासह बटलर आयपीएल २०२२ मध्ये शतक करणारा पहिला फलंदाज ठरला (First Century Of IPL 2022) आहे.
हे बटलरचे आयपीएलमधील दुसरे शतक आहे. तसेच राजस्थान संघाकडूनही हे त्याचे दुसरेच शतक आहे. यापूर्वी त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १२४ धावा फटकावत आयपीएलमधील पहिले शतक झळकावले होते.
आयपीएलमध्ये ३ वर्षांमध्ये केली गेलीत १६ शतके
आयपीएल २०१९ नंतर केले गेलेले हे १६ वे शतक होते. विशेष म्हणजे, या १६ पैकी १२ शतके ही भारतीय फलंदाजांच्या बॅटमधून निघाली आहेत. तर उरलेली ४ शतके विदेशी खेळाडूंनी केली आहेत. त्यातही रोमांचक बाब अशी की, ही शतके करणारे चारही विदेशी खेळाडू इंग्लंडचे राहिले आहेत. इंग्लंडच्या बटलरने आयपीएलमध्ये २ शतके केली आहेत. तर त्याचे संघ सहकारी जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्स यांनीही गेल्या ३ वर्षांमध्ये प्रत्येकी १ शतक केले आहे.
आयपीएलमध्ये शेवटची ६ शतके
बेन स्टोक्स – राजस्थान रॉयल्स संघाकडून
संजू सॅमसन – राजस्थान रॉयल्स संघाकडून
देवदत्त पडिक्कल – राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध (पण सध्या RR संघासोबत)
जोस बटलर – राजस्थान रॉयल्स संघाकडून
रुतुराज गायकवाड – राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध
जोस बटलर – राजस्थान रॉयल्स संघाकडून*
महत्त्वाच्या बातम्या-
शाहरुख खान बाद होताच केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरचे ‘किंग खान’ स्टाईल सेलिब्रेशन; Video व्हायरल
…म्हणून विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची ट्रॉफी परत लंडनला पाठविण्यात आली
रसलच्या तुफानी खेळीचं किंगखानकडून कौतुक! म्हणाला, ‘चेंडू एवढा उंच उडताना…’





